देशभरात सातत्याने इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या, त्यामधील बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत केवळ इलेक्ट्रिक स्कूटर्स, बाइक आणि इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्या कंपन्यांच्या डीलरशिप्समध्ये आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आता इलेक्ट्रिक कारलाही आग लागण्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता नुकतीच जगभरात सुरक्षित कार बनवण्यासाठी ओळखली जाणाऱ्या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे.
एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये Volvo C40 Recharge इलेक्ट्रिक कार जळताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ कार मालकाने आपल्या मोबाईलवर शूट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार गुरुग्राममधून महिन्याभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. कारचा मालक स्वप्नीलने सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याचा मोठा भाऊ सौरभ कार चालवत होता. सौरभ त्याच्या तीन मित्रांसह रायपूरहून सरायपालीला जात होता. कारला आग लागल्याची घटना रायपूरपासून १३८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बसनाजवळ घडली. कारला आग लागण्याआधी, सर्वप्रथम, कार चालवताना, व्होल्वो कंपनीच्या या आलिशान इलेक्ट्रिक कारने ‘कट-कट’ आवाज काढण्यास सुरुवात केली आणि कारच्या मागच्या चाकाच्या खालून धूर निघत असल्याचे त्यांना दिसले, असल्याचे स्वप्नीलने सांगितले.
Friend bought @volvocarsin #C40Recharge last month, a few hours back it malfunctioned on the road and within minutes it burnt completely. Shocking for a Volvo !
Luckily all the people were already out on the road. @ktakshish@FasBeam@hormazdsorabjee pic.twitter.com/Kj5qYdj35S
— Parva Dubey (@ParvaDubey) January 27, 2024
धूर निघत असल्याचे पाहून कारमधील सर्व प्रवासी बाहेर पडले आणि व्होल्वो रोडसाईड असिस्टन्सला फोन केला. कॉलवर बोलत असतानाच अचानक कारचा स्फोट झाला. स्फोटानंतर कार समोरून आदळली आणि जळून खाक झाली. याप्रकरणी कार मालक कंपनीशी बोलत आहेत, मात्र आग कशामुळे लागली याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. वेळीच सर्व प्रवासी आणि गाडीचे मालक गाडीतून बाहेर आल्याने सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही.
कारचे फीचर्स जाणून घ्या
ही एक ५-सीटर इलेक्ट्रिक कार आहे. या इलेक्ट्रिकमध्ये ७८kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, लिथियम आयन बॅटरी १५०kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फास्ट चार्जच्या मदतीने कार अवघ्या २७ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते. ही कार फक्त ४.७ सेकंदात ० ते १०० चा स्पीड पकडते, कारचा टॉप स्पीड १८०km/h असल्याची माहिती आहे.
कारचं डिझाइनही आकर्षक आहे. हॅमर एलईडी हॅण्डलॅम्प देण्यात आला आहे. तसेच टेल लॅम्पमध्ये व्हर्टिकल एलईडी लॅम्पचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये मुबलक केबिन स्पेस आहे. १४ इंचांचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, ५ ड्राइव्हिंग मोड्स, देण्यात आलं आहेत. ही कार अनेक लक्झरी आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत ६२.९० लाख रुपये आहे.
खरंतर तर व्होल्वो कार सुरक्षिततेसाठी ओळखल्या जातात. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अद्याप या घटनेबाबत व्होल्वोकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान सातत्याने इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीच्या बातम्या समोर येत असल्याने इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करायची की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.