विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान

Ruling MLAs' push and shove in the legislature lobby brings shame to Maharashtra; Congress attack
Ruling MLAs' push and shove in the legislature lobby brings shame to Maharashtra; Congress attack

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसपुढे जागा कायम राखण्याचे आव्हान असेल. मतदारसंख्या कमी असल्याने सोलापूर आणि नगर या दोन मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. मुंबईत दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा शिवसेना आणि भाजपला मिळू शकते.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मुंबईतील दोन, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नगर, अकोला-बुलढाणा-वाशीम, धुळे-नंदुरबार आमदारांची मुदत १ जानेवारीला संपुष्टात येत आहे. गेल्या दीड वर्षांत पाच महानगरपालिका आणि १०० पेक्षा अधिक नगरपालिकांची मुदत संपली असली तरी करोनामुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत.

स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघात ७५ टक्के  मतदार मतदानासाठी पात्र असल्याशिवाय निवडणूक घेता येत नाही. या निकषात बसत नसल्यानेच सोलापूर आणि नगर या दोन मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर पडली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी मतदार पात्र ठरत होते.  स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे सर्व सदस्य हे मतदार असतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने नगरसेवक मंडळींसाठी विधान परिषदेची निवडणूक ही ‘पर्वणी’ मानली जाते. नागपूरमध्ये भाजपला जागा कायम राखण्यात अडचण येणार नाही. धुळे-नंदुरबारमध्ये पक्षापेक्षा अमरिश पटेल हे प्रभावी ठरतात. कोल्हापूरमध्ये राज्यमंत्री व काँग्रेसचे सतेज पाटील हे पुन्हा बाजी मारतील अशी चिन्हे आहेत. अकोला-बुलढाणा-वाशीमध्ये शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया यांच्यासमोर भाजपचे आव्हान असेल.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत राजकीय निष्ठेपेक्षा लक्ष्मीदर्शन अधिक प्रभावी ठरते, हे नेहमीच अनुभवास येते. जो जास्त लक्ष्मीदर्शन करेल त्याच्या बाजूने कौल मिळतो. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक ही नगरसेवक मंडळींसाठी पर्वणीच मानली जाते. त्यातच लगेचच नगरपालिके ची निवडणूक होणार असल्याने निवडणूक खर्चास हातभार लागू शकतो.

यामुळेच नगरसेवक मंडळी या निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट बघत होते. २०१६-१७ या वर्षांत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकीय चित्र बदलले होते. राज्यात भाजपने सर्वाधिक यश संपादन के ले होते. त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत होऊ शकतो.

काँग्रेससमोर आव्हान

मुंबईतील दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या वेळी जिंकली होती. २०१७च्या महापालिका निवडणुकीत चित्र बदलले आणि काँग्रेसचे संख्याबळ घटले, तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली. यामुळे मुंबईत शिवसेनेची एक तर भाजपची एक जागा निवडून येईल. काँग्रेसला मुंबईतील जागा गमवावी लागणार आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री बंटी पाटील हे सारी शक्ती पणाला लावतील यात शंकाच नाही. कोल्हापूरची जागा बंटी पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांना सारी ताकद पणाला लावावी लागेल.

नागपूरमध्ये भाजपपुढे तेवढे कडवे आव्हान नसेल. धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल हे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा विजय निश्चित असतो. काँग्रेसचा राजीनामा देऊन अमरीश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश के ला व आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी एकतर्फी विजय संपादन के ला होता. या वेळीही अमरीश पटेल त्या विजयाची पुनरावृत्ती करतील अशीच शक्यता आहे. अकोला- बुलढाणा- वाशीम मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया यांनी मागे शिवसेनेचे संख्याबळ कमी असतानाही जादू केली होती. या वेळी त्यांच्यापुढे भाजपचे आव्हान असेल. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसची मुंबईतील एक जागा कमी होणार आहे. भाजप आपल्या दोन्ही जागा सहज कायम राखू शकते. शिवसेना मुंबईची जागा कायम राखू शकते.

हे आहेत निवृत्त होणारे सदस्य

मुंबई : रामदास कदम (शिवसेना), भाई जगताप (काँग्रेस)

नागपूर :गिरीश व्यास (भाजप)

सोलापूर :प्रशांत परिचारक – अपक्ष भाजपप्रणीत

कोल्हापूर : राज्यमंत्री बंटी (सतेज) पाटील – काँग्रेस

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल – भाजप

अहमदनगर :अरुण जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस

अकोला-बुलढाणा-वाशीम :गोपीकिसन बजोरिया –  शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here