सकाळच्या ‘यिन’ची (यंग इन्स्पिरेशन नेटवर्क) राज्यभरात निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. याच निमित्ताने सध्या मी राज्यभर फिरतोय. त्या दिवशी मी मुळशी भागात असणाऱ्या अनेक कॉलेजचा दौरा करत होतो. भेटीगाठी झाल्या, कार्यक्रम झाले. मी परतीच्या दिशेने निघालो. माले या गावाजवळच्या हिवाळी वस्तीमध्ये असणाऱ्या शाळेसमोर मी गाडी थांबवली. एका सुरात त्या शाळेत मुलं मन हेलावून टाकणारी प्रार्थना म्हणत होती.
खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे…
साने गुरुजींची ही प्रार्थना मी राष्ट्र सेवा दलात होतो तेव्हापासून पाठ आहे. हल्ली शाळांमधून अशी गीतं कानांवर पडणं कठीण होऊन बसलं आहे, या विचारातच मी शाळेत गेलो. शाळेतल्या सरांशी बोललो. तिथले शिक्षक खरंच उपक्रमशील होते. सरांनी मला पाणी दिलं. मी सरांना म्हणालो, ‘‘पाणी किती गोड आहे!’’ सर त्यावर म्हणाले, ‘‘अहो एकेकाळी अशी परिस्थिती होती, की प्यायला पाणी मिळायचं नाही. एका व्यक्तीने शाळेत बोअरवेल करून दिली. आता मुबलक पाणी आहे.’’ त्या बोअर करून देणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या सामाजिक कार्यांविषयी मी त्या शाळेत ऐकलं. त्या व्यक्तीचं काम पाहून आपण या व्यक्तीला भेटलंच पाहिजे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. त्या शिक्षकांचा निरोप घेऊन मी पुण्याच्या दिशेने निघालो. त्या शिक्षकांकडून मी त्या व्यक्तीचा नंबर घेतला, त्यांच्याशी फोनवर बोललो. कुठं, किती वाजता भेटायचं हे ठरलं. कोथरूडमधल्या ‘जंजिरा’ या हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं. जंजिरा हे सीफूडसाठी प्रसिद्ध असलेलं पुण्यातलं हॉटेल. कदाचित त्या व्यक्तीला मला घरी बोलावणं सयुक्तिक वाटलं नसेल, म्हणून त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं असावं असं मला वाटलं. मी खूप वाट पाहिली. त्यांना पुन्हा फोन केला, तर ते म्हणाले, ‘‘मी आता निघालोय.’’ मी बराच वेळ वाट पाहिली; पण त्यांचा फोन काही लागेना. शेवटी कंटाळून मी जेवण मागवलं.
जेवण आलं. एक व्यक्ती प्रत्येक टेबलवर जाऊन जेवण कसं आहे, सेवा बरोबर मिळतेय का, काही अडचण नाही ना… अशी विचारपूस करत होती. तशी ती व्यक्ती माझ्याकडेही विचारायला आली. जेवढी त्या जेवणाला चव होती, तेवढीच आत्मीयता त्या माणसाच्या बोलण्यात होती. मी बाजूच्या वेटरला विचारलं, ‘हे कोण?’ तर तो वेटर म्हणाला, ‘‘हे हॉटेलचे मालक आहेत.’’ मी म्हणालो, ‘‘छान.’’ तो वेटर पुन्हा म्हणाला, ‘‘ते जेव्हा येतात तेव्हा असंच प्रत्येकाला आत्मीयतेने बोलत असतात.’’ मला एकदम कमाल वाटली. एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक, पण प्रत्येकाला विचारतोय हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. मी ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलो होतो, त्यांचा मला पुन्हा कॉल आला. ते म्हणाले, ‘‘माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती, त्यामुळे तो बंद झाला होता. तुम्ही पोहोचलात का हॉटेलला?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘मी हॉटेलला पोहोचून जेवणही सुरू केलं. मला खूप भूकही लागली होती.’’ ते तिकडून नम्रपणे म्हणाले, ‘‘कुठे बसलात तुम्ही?’’ मी समोर पहिलं, तर जी व्यक्ती हॉटेलमध्ये प्रत्येकाला विचारत होती, तीच बोलत होती, तीच ती व्यक्ती. मला एकदम धक्का बसला. ते हसत माझ्या बाजूला येऊन बसले.
माझ्या समोर असलेल्या जेवणाच्या भांड्यामधलं अन्न घेऊन ते माझ्या ताटामध्ये वाढत होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही जेवणार नाही का?’’ ते म्हणाले, ‘‘जेवणासाठी घरी सगळे माझी वाट पाहत असतील.’’ मी त्यांना पुन्हा म्हणालो, ‘‘एवढं चांगलं हॉटेलचं जेवण सोडून तुम्हाला घरचं खावं कसं वाटतं?’’ ते हसत म्हणाले, ‘‘हॉटेलचा मसाला आणि माझ्या घरच्या जेवणाचा मसाला माझी पत्नी संध्या हीच बनवते, त्यामुळे घरी आणि हॉटेलची चव सारखीच असते.’’ आम्ही हसून एकमेकांना प्रतिसाद दिला.
मी त्यांना म्हणालो, ‘‘मला माहिती नव्हतं, तुम्ही या हॉटेलचे मालक आहात ते. मला वाटलं, तुम्हाला घरी बोलायला आवडणार नाही, म्हणून तुम्ही मला हॉटेलमध्ये बोलावलं.’’ ते म्हणाले, ‘‘नाही हो, असं काही नाही. तुमचा पाहुणचार करावा हा हेतू होता. आपल्याला घरीही जायचं आहेच. मी माझ्या पत्नीला घरी सांगून ठेवलं आहे, तुम्ही घरी येणार आहात म्हणून.’’ त्यांनी बाजूला असलेल्या दोन मुलांना आवाज दिला. ती दोन मुलंसुद्धा त्या हॉटेलमध्ये सर्वांची विचारपूस करत होती. ती दोन्ही मुलं आमच्याजवळ आली. त्यांची ओळख करून देत ती व्यक्ती म्हणाली, ‘‘ही माझी दोन्ही मुलं.’’ मला अजून एक धक्का बसला. अतिशय नम्रपणे ती दोन्ही मुलं प्रत्येकाशी बोलत होती. आम्ही चौघे बोलत बसलो. बराच वेळ आमच्या गप्पा चालल्या.
एक व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करते. सगळ्यांची काळजी घेते. मी जे काही कमावलेलं आहे त्याची या समाजासाठी परतफेड करायची वेळ आली आहे, या भावनेतून सेवाभावी कामात स्वतःला गुंतवून घेते. अशा व्यक्ती समाजामध्ये फार कमी पाहायला मिळतात. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव विलास चोरगे. विलास चोरगे मुळशी तालुक्यामधील सुतारवाडी या गावचे. त्यांचे वडील गणपत चोरगे हे गवंडी होते. विलास सात वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. कुटुंबाचा भार त्यांच्या आई द्रौपदाबाई यांच्यावर पडला. द्रौपदाबाई यांनी आपल्या घरासमोर मांडव, परड घातला आणि त्या मांडवावर काकडीच्या वेली लावल्या. ती काकडी त्या पुण्यामध्ये घरोघरी जाऊन विकायच्या. त्यांनी विलास आणि त्यांच्या भावंडांना लहानाचं मोठं केलं. आपल्या आईवर एकटीवर संसाराचा भार पडतो हे लक्षात आल्यावर विलास यांनी अनेक वर्षं विठ्ठलवाडी गावातल्या विठ्ठल मंदिरासमोर पानं-फुलं विकली. आपला व्यवसाय वाढवला पाहिजे या भावनेतून त्यांनी मोठ्या हलाखीच्या स्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. १९७८ मध्ये विलास चोरगे पुण्यात आले. त्यांनी पुण्यात पहिल्यांदा अलका टॉकीजच्या समोर भुर्जीपावची गाडी सुरू केली. पुढे हा व्यवसाय प्रचंड वाढला. आता पुण्यात जंजिरा ग्रुप, ग्रुप विल्सन, लेक व्हिव व्हिला… अशी त्यांची हॉटेलची साखळी उभी राहिली आहे. विलास चोरगे यांची चेतन आणि अनिकेत ही दोन्हीही मुले परदेशातून उच्चशिक्षित झाली आहेत. परदेशात या दोन्ही मुलांना मोठी नोकरीदेखील होती. तिथली नोकरी सोडून हे दोघेहीजण पुण्यात आले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या हॉटेल व्यवसायाची सूत्रं हाती घेतली. आज विलास चोरगे यांच्याकडे सर्व ठिकाणी मिळून चारशेहून अधिक जण काम करतात.
मागच्या वीस वर्षांच्या कालावधीत विलास चोरगे काका यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक युवकांना हॉटेल व्यवसाय सुरू करून दिला. आता मुलांनी व्यवसायाचा कारभार हातात घेतल्यावर चोरगे काका हे पूर्णपणे सेवाभावी कामात मग्न झाले आहेत. चोरगे काका (८८०५८२५४००) बोलताना मला सांगत होते, ‘‘आमची गरिबी होती. माझी आई द्रौपदाबाई सांगायची, हाताच्या रेषा पाहायच्या नाहीत, तर कष्टाच्या रेषांवर विश्वास ठेवायचा. लोकांचा विश्वास जिंकायचा, लोकांना तृप्त करायचं. आम्हा सगळ्यांना सोडून जाताना ती म्हणाली, बाबा, आपला लोकसेवेचा वसा कायम ठेव.’’ आपल्या आईवर प्रचंड प्रेम असणारे विलास चोरगे काका आईविषयी सांगताना खूप भावुक झाले होते.
आम्ही बोलत बोलत गाडीत बसलो. मी बोलता बोलता चोरगे काकांना म्हणालो, ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्ही जी बोअरवेल घेतली ती कशी काय?’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘तिथं मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. मी सुतारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. मी जेव्हा देण्याच्या भूमिकेमध्ये आलो, तेव्हा जिल्हा परिषद शाळेला आपण मदत केली पाहिजे असा विचार आला. तिथं बहुजनांची, गरिबांची मुलं शिकतात. माझ्या गावच्या आसपास असणाऱ्या अनेक गावांतल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा देण्यासाठी माझा पुढाकार आहे. गावकरीही त्यासाठी मला मदत करतात. कुठं बोअर मारला, कुठं शाळा खोलीचं बांधकाम, कुठं टेबल, साहित्य, कुठं खाऊ, असं माझं काम सुरू आहे. पुण्यातल्या अनेक वसतिशाळांत आम्ही ‘एक आठवडा गोड जेवण’ देण्याचं काम हाती घेतलं. ‘त्या’ लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावर जेव्हा मी ‘तृप्ती’चे भाव पाहतो ना तेव्हा असं वाटतं, की माझी खरी कमाई हीच आहे.’’
आम्ही घरी पोहोचलो. काकांच्या मोठ्या सूनबाई पूजा आर्किटेक्चर, छोट्या सूनबाई डॉक्टर, चोरगे काकांच्या पत्नी संध्या तिघीही प्रचंड उत्साही. काकांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. आम्ही सर्वांनी खूप वेळ गप्पा मारल्या. त्या गप्पांमधून दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं यांचा व्यवसायापेक्षा सामाजिक कामांकडे अधिक कल होता, हे लक्षात आलं. त्यांचं जेवण सुरू होतं त्याच ठिकाणी आमच्या गप्पा सुरू होत्या. मी आता त्यांचा निरोप घेऊन मुंबईकडे परतीच्या दिशेने रस्त्याला लागलो. त्या घरामध्ये असलेलं कौटुंबिक वातावरण, सगळ्यांवरचे संस्कार, आई-वडिलांचा शब्द म्हणजे सर्वकाही, हे सगळं बघितल्यावर सुखी कुटुंब आणि मोठ्या मनाची माणसं नेमकी कशी असतात, याची प्रचिती मला येत होती.
आपल्याकडे किती आहे, यापेक्षा त्यातून इतरांना देण्याची दानत किती आहे हे महत्त्वाचं आहे. आपण इतरांना दिलं तर आपल्यालाही भरभरून मिळतं, या भावनेतून काम करणारे विलास चोरगे आणि त्यांचं कुटुंब आज सेवाभावी कार्यातही आपली ओळख निर्माण करत आहे. या कुटुंबाचा मुख्य आधारवड असलेले विलास चोरगे काका हे या ‘चांगुलपणाचे धनी’ आहेत, जे आता ‘माझे दिवस या समाजासाठी परतफेडीचे’ आहेत, म्हणून काम करीत आहेत.
संदीप काळे,पत्रकार