रांगोळीचा सडा, फुलांची उधळण करून भारत जोडो यात्रेचे स्वागत

Welcome to Bharat Jodo Yatra by spreading Rangoli and flowers
Welcome to Bharat Jodo Yatra by spreading Rangoli and flowers

जलंब, (जिल्हा बुलढाणा) : सात वर्षाची चिमुरडी कोमल राजीव साठे, शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीत उठून कामाला लागली होती. पत्रे बांधून बनवलेल्या छोट्याशा घराच्या अंगणात साफसफाई केली. नन्तर दारात सडा टाकून रांगोळी घालण्यात मग्न झाली. तिने “सुस्वागतम भारत जोडो” असे रांगोळीत कोरले होते.

शेगावपासून सहा किलोमीटरवरील खेर्डी (ता. खामगाव) या छोट्याशा खेडेगावात प्रत्येक दारात अशा सुबक रांगोळ्या कोरल्या होत्या. राहुलजींची भारत जोडो यात्रा याच रस्त्यावरून जाणार हे ऐकून त्या फार खुश होत्या. कोमल, जयश्री साठे, प्रिया उंबरकर या राहुलजींना पाहण्यास, भेटण्यास खूप उत्सुक होत्या. अशाच अनेक रांगोळ्या प्रत्येक घरासमोर दिसत होत्या आणि दारात मुलाबाळांसह फुले घेऊन राहुलजींच्या स्वागतासाठी महिला लहान मुलांसह उभ्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांची प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली होती. सकाळी सहा वाजता पदयात्रेला शेगावच्या बाजार समितीपासून सुरुवात झाली. खेर्डी येथे साडेसातच्या सुमारास यात्रा दाखल झाली. फुलांच्या वर्षावात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

जलंब येथे दहा वाजता मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत झाले. येथील शाळेच्या मुलांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी मोठी रांग लावली होती. काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होते. अभिरा अभय गोंड या तीन वर्षांच्या मुलगी बालशिवाजी वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते.

कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते शाळीग्राम कळसकर (वय 86) आपल्या तीन पिढ्यांसह राजकारणात आहेत, ते  सहकुटुंब स्वागतासाठी उभे होते. नांदुरा येथील शिवाजी हायस्कुलच्या मुलीचे लेझीम पथक बहारदार होते. तर खामगावच्या रुक्मिणी भजनी मंडळाने विठ्ठल रखुमाई देखाव्यात “बेटी बचाव” भजन सादर करत होत्या. राणा लकी शाळेच्या मुलांनी आदिवासी नृत्य सादर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here