अमेरिकेत मोदींना भारतातील अल्पसंख्यकांबाबत प्रश्न विचारणारी महिला पत्रकार ट्रोल, व्हाईट हाऊसने नोंदवला निषेध, म्हणाले…

 सबरीना सिद्दीकी यांनी मोदींना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, मुस्लिमांचे हक्क आणि भाषण स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला होता. मोदींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिले होते.

white-house-condemns-harassment-of-journalist-who-asked-pm-modi-a-question-news-update
white-house-condemns-harassment-of-journalist-who-asked-pm-modi-a-question-news-update

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौरा करून भारतात परतले आहेत. अमेरिकेत मोदींचं जोरदार स्वागत झालं. मोदींच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. या पत्रकार परिषदेत मोदींना प्रश्न विचारणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. या ट्रोलवरून व्हाईट हाऊसने निषेध व्यक्त केला आहे.

२२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकींनाही आमंत्रण देण्यात आले होते. सबरीना सिद्दीकी यांनी मोदींना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, मुस्लिमांचे हक्क आणि भाषण स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला होता. मोदींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिले होते. परंतु, यानंतर, सिद्दीकी यांना ट्रोल करण्यात आले. त्यांचा हेतू आणि त्यांच्या वारशावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं.

 या ट्रोलर्सना उत्तर देताना सिद्दीकींनी एक ट्विटर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, “काहींनी माझ्या वैयक्तिक पार्श्वभूमीचा मुद्दा मांडणे निवडले आहे. त्यामुळे फोटो दाखवणे योग्य वाटतं. कारण काहीवेळा ओळखी दिसतात त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीच्या असतात.” २४ जून रोजी सिद्दीकी यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या टी-शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. तसंच, त्यांच्या वडिलांनीही भारतीय क्रिकेट संघाचे टीशर्ट परिधान केला आहे. २०११ मध्ये क्रिकेट विश्व स्पर्धेत भारत जिंकत असतानाचे हे फोटो असल्याचं सांगण्यात येतंय.

 व्हाईट हाऊसने नोंदवला निषेध

“हे अस्वीकार्य आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही पत्रकारांच्या कोणत्याही छळाचा पूर्णपणे निषेध करतो”, असं युएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे धोरणात्मक संपर्क प्रमुख जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे. “आम्ही कोणत्याही पत्रकाराला धमकावण्याच्या किंवा त्रास देण्याच्या प्रयत्नांचा नक्कीच निषेध करतो”, असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here