उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या नरेंद्र मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?: राहुल गांधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मोदी व RSS कडून संपवण्याचा प्रयत्न, संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची लढाई.

Why did Narendra Modi, who gave loan waiver of 16 lakh crores to industrialists, not waive the loan of any farmer in the country?: Rahul Gandhi
Why did Narendra Modi, who gave loan waiver of 16 lakh crores to industrialists, not waive the loan of any farmer in the country?: Rahul Gandhi

गोंदिया : शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार (BJP Government) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ११ वर्षात एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? असा सवाल करत मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानीच्या लग्नात गेले पण मी गेलो नाही कारण मी तुमचा आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सांगितले.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची गोंदियात जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, उमेदवार गोपाल अग्रवाल, दिलीप बनसोड, राजकुमार पुराम, रवी बोपचे, खुशाल बोपचे आदी उपस्थित होते.

भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशाच्या संविधानात हजारो वर्षापासूनचे विचार आहेत, भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, या संविधान समानता, प्रेम, सर्व धर्मांचा आदर आहे पण हे लाल रंगाचे संविधान दाखवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, गरीब, शेतकरी यांच्यावर अन्याय, अत्याचार करावे असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान मोदींनी देशाचे हे संविधान वाचलेच नाही. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी २४ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर हल्ले करून ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेस मात्र या संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी असल्याचे सांगत असतात आणि त्याच ओबीसींचा सातत्याने अपमान करतात. ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्के असताना मोदी सरकार त्यांच्यावर फक्त ५ टक्के खर्च करते, हा खरा ओबीसी समाजाचा अपमान आहे. म्हणूनच जातनिहाय जनगणना करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे तसेच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवण्याचा प्रयत्न आहे.

काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तिसढमध्ये धानाला ३ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता केली आहे. कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास सुरु केला आहे, महालक्ष्मी योजनाही सुरु केली आहे. महाराष्ट्रात मविआचे सरकार आल्यास दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये खटाखट, खटाखट जमा केले जातील, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, धानाला बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करु, २५ लाखांचा आरोग्य विमा, तरुणांना ४ हजारांचा भत्ता व २.५ लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करु, असे आश्वासन देत नरेंद्र मोदी मुठभर अरबपतींना जेवढे पैसे देतील तेवढे पैसे काँग्रेस सरकार गरिबांना देईल असे राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जनतेत भाजपाविरोधी मोठा रोष असल्याचे राज्यात चित्र आहे. भाजपाच्या राज्यात महागाई गगणाला भिडल्याने गरीबांना जगणे कठीण झाले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतकरी संकटात आहे. भाजपा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराची पायमल्ली करत असून भ्रष्टाचाराने भाजपा युतीचे हात बरबटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केल्याने तो आठ महिन्यात कोसळला. शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे पाप भाजपाने केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. मोदी ज्याला हात लावतात त्याचे नुकसान होते, असे नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here