नवी दिल्ली: सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन काँग्रेसने कर्नाटकात प्रचारांचा धुराळा उडवला होता. आपल्या जाहीरनाम्यातही त्यांनी सामान्य माणूस, महिला आणि युवकांना प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे काँग्रेसला कर्नाटकात अभुतपूर्व यश मिळालं आहे. काँग्रेसने तिथे एकहाती सत्ता मिळवली असून आता त्यांचं लक्ष्य मध्य प्रदेशकडे वळले आहे. आगामी काळात मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुका लागणार असून कर्नाटक पॅटर्नच येथे राबवणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसने मध्य प्रदेशातील जनतेसाठी पाच आश्वासने जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही आश्वासने जाहीर करण्यात आली आहेत. महागाईने उच्चांक गाठलेला असताना सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. अशातच सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता सिलिंडर अवघ्या ५०० रुपयांत देणार असल्याचं आश्वासन काँग्रेसने मध्य प्रदेशच्या जनतेला दिलं आहे.
तसंच, प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना, १०० युनिटपर्यंत मोफत वीज, तर २०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत देण्यात येईल. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. तर, जुनी पेन्शन योजनाही लागू करणार, असं आश्वासन देण्यात आलं आहे. आम्ही कर्नाटकात आश्वासन पूर्ण केले आहेत, आता मध्य प्रदेशातही करणार. जय जनता, जय काँग्रेस असं या ट्वीटमध्ये नमूद आहे.