India Ranking in World Happiness Index: आनंदी आयुष्याच्या जागतिक क्रमवारीत भारत पाकिस्तानच्याही खाली!

India in World Happiness Index: भारतात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारकडून देशवासीयांच्या जीवनमा नात, आयुष्यमानात सकारात्मक बदल घडवून आणल्याचा दावा केला जातो. मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा मग राज्यातलं सरकार असो. प्रत्येकानंच जनतेसाठीचं सरकार आणि जनतेसाठी केलेल्या कामांची यादी याचा कायमच धोशा लावल्याचं दिसून आलं आहे. पण एवढं असूनही, भारतीय आनंदी नसल्याचं चित्र जागतिक आकडेवारीतून समोर आलं आहे. World Happiness Day अर्थात २० मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या World Happiness Index नुसार भारताचं स्थान जागतिक यादीत काहीसं सुधारलं असलं, तरी आपला क्रमांक अजूनही शेवटून मोजण्याची परिस्थिती कायम असल्याचं दिसून येत आहे.

दरवर्षी २० मार्च रोजी ही यादी जाहीर केली जाते. यंदाही ती जाहीर करण्यात आली असून त्यातून गेल्या वर्षभरात भारतीयांच्या आनंदात फारशी भर पडली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्ककडून ही यादी दाहीर केली जाते. ही यादी तयार करताना वेगवेगळ्या निकषांचा वापर केला जातो. त्याआधारे जगभरातल्या देशांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन करून त्यानुसार यादीतील स्थान निश्चित केलं जातं.

जगातील सर्वात आनंदी १० देश कोणते?

या यादीनुसार जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये गेल्या सहा वर्षांप्रमाणे याही वर्षी फिनलँडनं अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यापाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, इस्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वीत्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश जगातील सर्वाधिक आनंदी १० देशांमध्ये होतो.

१३७ देशांमध्ये सर्वात कमी आनंदी देश कोणते?

एकीकडे सर्वात जास्त आनंदी देशांप्रमाणेच सर्वात कमी आनंदी देशांमध्ये तालिबानची राजवट असणारा अफगाणिस्तान सर्वात तळाच्या स्थानी आहे. त्याव्यतिरिक्त लेबेनॉन, झिम्बाब्वे, कांगो या देशांचा सर्वात कमी आनंदी देशांमध्ये समावेश होतो.

भारताचं स्थान पाकिस्तानपेक्षाही खाली!

दरम्यान, आर्थिक महासत्ता होण्याच्या स्वप्नासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारताचं स्थान या यादीत पहिल्या शंभरातही नसल्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे. १३७ देशांमध्ये भारत या यादीत १२५व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी हेच स्थान १३६ होतं. आशिया खंडातील शेजारी देशांपेक्षा अजूनही भारताचं स्थान खालचं आहे. पाकिस्तान या यादीत १०८व्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ बांगलादेश ११८व्या स्थानी, श्रीलंका ११२ व्या स्थानी तर नेपाळ थेट पहिल्या शंभरात म्हणजेचच ७८ व्या स्थानी आहे!

देशांची क्रमवारी ठरवण्यासाठी कोणते निकष?

World Happiness Index मध्ये देशांची क्रमवारी ठरवण्यासाठी साधारणपणे अपेक्षित आयुष्यमान, जीडीपी, सामाजिक सलोखा, भ्रष्टाचाराचं प्रमाण आणि आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं नागरिकांना असणारं स्वातंत्र्य अशा बाबींचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here