WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण संघ

wtc-final-2023-team-india-announced-for-wtc-final-ajinkya-rahane-returns-see-full-squad-news-update-today
wtc-final-2023-team-india-announced-for-wtc-final-ajinkya-rahane-returns-see-full-squad-news-update-today

Team India for WTC Final 2023: आयपीएल २०२३ दरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याला इंग्लंडमध्ये ७ जूनपासून होणार आहे. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आधीच पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ आधीच जाहीर झाला होता, आता बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे.

संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती असेल, तर अशा अनेक खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे, जे भारतीय कसोटी संघातून बराच काळ बाहेर होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या आणि उत्कृष्ट खेळ दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयने बक्षीस दिले आहे. त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ७ जून ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. महत्त्वाच्या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तब्बल वर्षभरानंतर अजिंक्य रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे मधल्या फळीत जागा रिकामी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने सूर्यकुमार यादवला स्थान दिलं होतं. पण तो डाव यशस्वी झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवड समितीने वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेवरच विश्वास व्यक्त केला आहे. यासोबतच रहाणेला आयपीएलमधील चमकदार कामगिरीचे बक्षीसही मिळाले आहे. अशातच महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी करूनही सर्वंच्या टीकेचा धनी झालेला केएल राहुलला टीम इंडियातील जागा वाचवण्यात यश आले. निवड समितीने विकेटकीपिंगसाठी केएस भरतवरच विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, मधली फळी आणखी मजबूत करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here