शाओमीने भारतीय मार्केटमध्ये Mi 10 हा फोन 5G सपोर्टसह लॉन्च केला आहे परंतु, भारतात 5G कनेक्टिव्हिटीची सुरूवात झालेली नाही. त्यामुळे भारतीयांना हा फोन 4G कनेक्टिव्हिटीवरच वापरावा लागणार आहे.
कंपनीचा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असल्याचं सांगितलं जातंय. Mi 10 5G भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेलाMi 10 5G हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असेल.
होल-पंच कटआउट आणि कर्व्ह्ड अॅमोलेड पॅनलसह या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच याच शूटस्टेडी मोडही आहे. याशिवाय दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत.
याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी आहे.
जाणून घ्या किंमत
Mi 10 5G फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे.