“सावरकरांबाबत जे काही बोलले..”, ‘त्या’ विधानावरून शिवानी वडेट्टीवारांनी भाजपावर साधला निशाणा!

Youth congress-shivani-vadettiwar-reaction-on-controversy-after-viral-video-on-veer-savarkar-news-update-today
Youth congress-shivani-vadettiwar-reaction-on-controversy-after-viral-video-on-veer-savarkar-news-update-today

नागपूर:चंद्रपूरमध्ये एका सभेत बोलताना प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार (Shivani vadettiwar) यांनी सावकरांबाबत एक विधान केलं होतं. “सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं त्या म्हणाल्या. त्याच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात आता दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, या वादावर आता शिवानी वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?

“संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मी माझे विचार मांडू शकते. मी सावकरांबाबत जे काही बोलले ते चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, मी माझे विचार मांडले”, अशी प्रतिक्रिया शिवानी वडेट्टीवार यांनी दिली..

काँग्रेस पक्ष नेहमीच सत्याच्या बाजुने

“काँग्रेस पक्ष नेहमीच सत्याच्या बाजुने उभा राहिला आहे. माझ्या व्हिडीओनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा मला पाठिंबा मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक उर्जा मिळते”, असेही त्या म्हणाल्या.

वज्रमूठ सभेबाबतही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीची निर्मिती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी झाली होती. या सभेला मी सुद्धा जाणार आहे. आज महागाई, बेरोजगारीसारखे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याविरोधात ही आजची सभा असेल”, असं त्यांनी नमूद केलं.

 नेमकं काय आहे प्रकरण?

युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सावकरांबाबत एक विधान केलं होते. “भाजपाचे हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकरांवर मोर्चा काढतात.

मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत सेल, सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं त्या म्हणाल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपाने त्यावर आक्षेप घेतला होता.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here