धुळे: धुळे जिल्ह्यातील (Dhule) साक्रीत एका अत्यंत विचित्र घटना घडाली. मस्करीमध्ये मित्राने एअर हायड्रॉलिक प्लास्टिक नळीच्या माध्यमातून मित्राच्या गुदद्वरात (प्रायव्हेट पार्टमध्ये) हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना साक्री तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मृत मुलाच्या पित्याच्या तक्रारीवरुन हर्षल जाधव या तरुणाविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटकही करण्यात आली आहे. तुषार निकुंभ ( वय 21 वर्ष) असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील छडवेल शिवारातील सुजलॉन कंपनीत सदरचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा निजामपूर पोलीस अधिक तपास करत आहे. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, तुषार निकुंभ ज्या कंपनीत काम करत होता तिथे इंटीग्रेटेड इंजिनिअर सर्व्हिसिंगचं काम चालायचं. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना आपल्या कपड्यांवरील आणि शरीरावरील धातूचे कण हटविण्यासाठी एअर प्रेशर पंप दिला होता.
प्रायव्हेट पार्टमध्ये पंपचं नोझल टाकून भरली हवा..
काम संपलं की, कर्मचारी आपल्या शरीरावरील धूळ हटविण्यासाठी या पंपचा वापर करायचे. जेव्हा तुषार हा आपल्या शरीरावरील धूळ हटविण्यासाठी गेला तेव्हा हर्षल जाधवने त्याला पकडलं आणि मस्करीत त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पंपचं नोझल टाकून जोरदार हवा भरली. यावेळी नोझल पंपमधील हवेचा दाब एवढा प्रचंड होता की, त्यामुळे तुषारच्या पोटातील महत्त्वाच्या अवयवयांना प्रचंड इजा झाली. यावेळी तो तात्काळ खाली कोसळला.
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, तुषार निकुंभ याला आधी एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याला गुजरातमधील सूरतमध्ये नेण्यात आलं. मात्र, पोटातील अवयवयांना झालेली दुखापत ही अत्यंत गंभीर होती. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी 28 वर्षीय हर्षल जाधव याला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी आता करत आहे.