‘आदिपुरुष’मध्ये एकनाथ शिंदे आहेत का? नेटकऱ्याकडून मुख्यमंत्र्यांची वानराशी तुलना, ट्वीटवर ठाणे पोलीस कमेंट करत म्हणाले…

मुंबई: बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. ‘आदिपुरुष’ला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक क्लिप्स व मीम्स व्हायरल होत आहेत.

एका नेटकऱ्याने ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत केलेलं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये नेटकऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘आदिपुरुष’ चित्रपटातील वानराशी तुलना केली आहे. एकनाथ शिंदे व चित्रपटातील वानराचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. “एकनाथ शिंदे ‘आदिपुरुष’मध्ये आहेत का? माहीत नाही”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या या ट्वीटची ठाणे पोलिसांनी दखल घेतली आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटवर ठाणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन रिप्लाय करण्यात आला आहे. “तुझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर” असं ठाणे पोलिसांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेल्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर टीका केली जात आहे. असं असतानाही या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९५ ते ९८ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here