महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करा: अमित देशमुख

Remove tainted faces of grand coalition from power in Maharashtra: Amit Deshmukh
Remove tainted faces of grand coalition from power in Maharashtra: Amit Deshmukh

लातूर : महायुती सरकारने महाराष्ट्राला लुटून खाल्ले, भ्रष्ट लोकांना मंत्रीपदे देण्यात आली. आता महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करण्याचे वेळ आहे त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले.

माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरु असून याचे नेतृत्व नाना पटोले करत आहेत. महायुतीच्या सरकारवर तोफ डागत देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एकही काम केले नाही. जायकडवाडी, माजलगाव, उजनीवरून पाणी देण्याचे केवळ आश्वासन दिले पण पाणी काही आले नाही. भाजपाने बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे घर फोडले, काँग्रेसचे घर फोडण्याचाही प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतीय जनता पक्षाने पुन्हा अपमान केला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, रामदास स्वामींनी छत्रपतींच्या सोबत तरुणांना उभे केले असे सांगून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे होते असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

राज्याच्या झंझावाती प्रचारावर असलेल्या नाना पटोले यांची लातूरच्या गंजगोलाई भागात जाहीर सभा झाली. या सभेला माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अॅड किरण जाधव, फारुख शेख यांच्यासह मविआचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांची फौज उभी केली, त्यात मुस्लीमांसह सर्व जाती धर्माचे लोक होते. भाजपा जाणीवपूर्वक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम करत आहे. सामान्य जनतेच्या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे प्रकार केला जात आहेत.

हेही वाचा : भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अपमान, रामदास स्वामींना शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा अमित शाहांचा प्रयत्न: नाना पटोले

मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण भाजपा युती सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रश्न सोडवला नाही. मविआची सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावर निर्णय घेतला जाईल. सोयाबीनचे एक केंद्र लातूर जिल्ह्यात उभे करु तसेच शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्मारकही उभे केले जाईल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here