”पाच वर्षात काय दिवे लावलेत चंद्रकांतदादांनी सांगावं”

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

congress-leader-prithviraj-chavan-slams-bjp-leader-chandrakant-patil-news-update
congress-leader-prithviraj-chavan-slams-bjp-leader-chandrakant-patil-news-update

मुंबई: भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापलं की प्रकरणं बाहेर काढली जातात. पण ही प्रकरणं दाबली जातात की आणखी काय होतं ते कळत नाही. सर्व प्रकरणे तात्पुरती बाहेर काढली जातात. राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, असं सांगतानाच पाच वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी लगावला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहे. मात्र, तरीही या संस्थांचा वापर केला जात आहे. सीबीआयकडे एक हजार खटले प्रलंबित आहेत, असं सांगतानाच सत्ता गेल्यावरच भाजपला सर्व प्रकरणे आठवू लागतात, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.

मोदींनी किती अधिवेशने घेतली त्याची माहिती घ्या…

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी कोरोना नसतानाही त्यांनी कितीवेळा अधिवेशनं घेतली याची भाजपने माहिती घ्यावी. त्यानंतरच बोलावं. कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी अधिवेशनाला राजकीय रंग देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच येणाऱ्या अधिवेशनात सरकारकडून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून सरकार पाडण्याचे प्रयत्न…

भाजपला निवडणुका जिंकून सत्ता मिळवता येत नाही तर तोडफोड करून सत्ता मिळवता येते, हे जग जाहीर झालं आहे. देशातील नागरिकांचे कोरोना काळात मोदी सरकारने हाल केले. हे सर्व पुसून टाकण्यासाठी राज्यांतील सरकार पडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. येणाऱ्या निवडणूकीत आघाडीला चांगलं यश मिळेल आणि भाजप राज्यातून संपेल, असा दावाही त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष हायकमांड ठरवणार…

चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर थेट भाष्य केलं नाही. विधासभेचं अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार हे निश्चित आहे. फक्त उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवेल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आता ही निवडणूक 6 तारखेला होणार की कधी हे सांगणं अवघड आहे, असं ते म्हणाले.

विरोधकांना रोखण्यासाठी अध्यक्ष नसतो…

विधानसभा अध्यक्षपदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेनेही तुमच्या नावाल संमती दर्शवली आहे. पण राष्ट्रवादीने विरोध केला आहे, असं चव्हाण यांना विचारण्यात आलं. त्यावेळी विधानसभा अध्यक्षाचं काम सभागृहाच्या कामकाजाला न्याय द्यायचं असतं. विरोधकांना रोखण्यासाठी अध्यक्ष नसतो. अध्यक्ष कोणत्याही एका पक्षाचा नसतो. तो सभागृहाचा अध्यक्ष असतो, असं सांगतानाच अध्यक्षपद हे महत्त्वाचं आहे. ते काँग्रेसला मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here