
नवी दिल्ली : दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रात मोठ्या नेत्यांचा,समाजसेवकांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयाती घोष यांच्यासह, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय यांची नावं दंगलीचा कट रचणाऱ्यांमध्ये उल्लेख करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, या लोकांनी नागरिकता संशोधन विधेयकाचा (सीएए) विरोध करणाऱ्यांना ‘कोणतीही हद्द पार करा’ असा सल्ला दिला होता. सीएए-एनआरसीला मुस्लिम विरोधी सांगत या समाजात नाराजी पसरवली आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दंगलीत ५३ लोकांचा झाला होता मृत्यू
दिल्लीच्या उत्तर पूर्व जिल्ह्यात २३ ते २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी जे पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये या सर्वांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. आरोपपत्रात दावा केला आहे की, दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता तसेच ५८१ लोक जखमी झाले होते. ज्यांपैकी ९७ गोळी लागून जखमी झाले होते. या मान्यवर लोकांना तीन विद्यार्थ्यांच्या जबाबानुसार आरोपी बनवण्यात आलं आहे. जेएनयूची विद्यार्थीनी देवांगना कालिता आणि नताशा नरवाल तसेच जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाची विद्यार्थीनी गुलफिशा फातिमा हीचाही समावेश आहे. या लोकांना जाफराबाद हिंसाचारप्रकरणी आरोपी बनवण्यात आलं आहे.