
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आठवडय़ात सलग पाचव्यांदा इंधन दरात वाढ केल्याने सोमवारी पेट्रोल, डिझेल दराने नवा उच्चांक नोंदवला. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली. याचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे.
सोमवारी पेट्रोल दरात २६ पैसे, तर डिझेल दरात ३३ पैशांनी वाढ करण्यात आली. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच ४ मेपासून सरकारी तेल कंपन्यांनी केलेली ही पाचवी दरवाढ आहे.
या दरवाढीमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला. दिल्लीत पेट्रोल दर ९१ रुपये ५३ पैसे आहे, तर डिझेलदर ८२ रुपये ६ पैसे झाला. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. भोपाळमध्ये पेट्रोल ९९ रुपये ५५ पैशांवर पोहोचले. राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल दर १०२ रुपये ४२ पैसे असून, मध्य प्रदेशात अनुपपूर येथे ते १०२ रुपये १२ पैसे झाले. काही राज्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल दर शंभरीपार गेले आहेत.
इंधनाच्या किमती या राज्यांनुसार वेगवेगळ्या असतात. त्यात मूल्यवर्धित कर व वाहतूक कर आकारले जात असल्याने दरवाढ वेगवेगळी असते. राजस्थानात मूल्यवर्धित कर सर्वाधिक असल्याने तेथे पेट्रोल दर अधिक आहे.
आठवडाभरात पेट्रोल लिटरमागे १ रुपया १४ पैसे, तर डिझेल दर १ रुपया ३३ पैशांनीवाढला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी दरात मोठी वाढ सुरू केली. खनिज तेलाचे दर सध्या पिंपाला ७० डॉलर्स आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारचे पेट्रोलवर ६० टक्के, तर डिझेलवर ५४ टक्के कर आहेत. केंद्र सरकारचा पेट्रोलवरचा अबकारी कर ३२ रुपये ९० पैसे असून डिझेलवर तो ३१ रुपये ८० पैसे आहे.
परभणीत पेट्रोल १०० रुपये २० पैसे
परभणीत सोमवारी पेट्रोल दर १०० रुपये २० पैशांवर पोहोचला. मुंबईत पेट्रोल दर ९७ रुपये ८६ पैसे असून, डिझेल दर ८९ रुपये १७ पैसे आहे. राज्याच्या अन्य भागांतही पेट्रोल लिटरमागे शंभर रुपयांच्या आसपास आहे.





































































































































