
मुंबई: मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळलं असतं असा दावा आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार हे शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे कोसळलं. मात्र आता अनिल देशमुख यांना हा दावा केला आहे. त्यामुळे या दाव्याचीही चर्चा होताना दिसते आहे. अनिल देशमुख यांचं म्हणणं रास्त आहे, मला तो सगळा प्रकार माहित आहे असं संजय राऊत यांनीही म्हटलंय.
काय म्हटलं आहे अनिल देशमुख यांनी?
दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे काही प्रस्ताव आले होते. मी जर समझौता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळलं असतं. मी सगळा त्रास सहन केला. मी कुठल्याही पद्धतीने कुणावर खोटे आरोप करणार नाही. मी कुठलीही तडजोड करायला नकार दिला. त्यामुळे मला सगळं भोगावं लागलं असं अनिल देशमुख यांनी टीव्ही ९ मराठीला सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी अनिल देशमुखांविषयी काय म्हटलं आहे?
“अनिल देशमुखांना कोणती ऑफर होती आणि कुठला दबाव त्यांच्यावर होता मला माहित आहे. त्यांच्याकडे त्यासंदर्भातले पुरावे आणि व्हिडीओ क्लीप्स त्यांच्याकडे आहे. अनिल देशमुख यांना कोण भेटलं? त्यांना कुणी ऑफर दिल्या? त्यांच्याशी कोण काय बोललं? कुठल्या सह्या घेऊ इच्छित होतं? कोणावर आरोप करण्यासाठी दबाव होता? ही सगळी माहिती त्यांच्याकडे होती. त्यांनी काही पुरावे शरद पवारांनाही दाखवले होते. ” असं म्हणत संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.