मला रडणाऱ्या बाईबद्दल बोलायचं नाही; महापौर पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला

mayor-kishori-pednekar-slams-chitra-wagh-over-female-bjp-worker-sexual-harassment-in-corporator-office-borivali-news-update
mayor-kishori-pednekar-slams-chitra-wagh-over-female-bjp-worker-sexual-harassment-in-corporator-office-borivali-news-update

मुंबई l मुंबईत बोरिवलीमध्ये भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी बोरिवलीत ही घटना घडली. य़ा घटनेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं,” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलिसांची भेट घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. यावेळी पेडणेकर यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

भाजपाच्या रडणाऱ्या बाईबद्दल मला काहीच बोलायचं नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलण्यास नकार दिला. तसेच पीडित महिला वर्षभर आमदार आणि खासदारांकडे न्याय मागत होती, त्यामुळे तक्रार दाखल केली नाही, असं पेडणेकर म्हणाल्या. बलात्कारासारख्या घटनांमध्ये राजकारण न आणता पीडितांना न्याय द्यायला पाहिजे. मी मुंबई पोलिसांना या प्रकरणात ज्या लोकांची नावं आहेत, त्या सर्वांची चौकशी करण्यास सांगितलंय, असंही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी बोरीवली प्रकरणावर बोलताना महापौर पेडणेकर यांनी थोबाड फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, तेव्हा तुम्हाला त्यांचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असा सवाल केला.

तसेच तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असंही चित्रा वाघ यांनी विचारलं. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणं तुम्हाला शोभत नाही, असं वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांना म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here