नागपूर : शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे. याचं कारण लोकसभेतली त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे. पण यात नवल काही नाही. शिवसेनेला ही सवयच आहे. ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कृषी विधेयकांवरुन फडणवीस यांनी काँग्रेस,राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या राज्यसभेच्या भूमिकेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात आम्ही लोकसभेत समर्थन दिलं आहे. जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय. खरं म्हणजे शिवसेनेने आधी भूमिका ठरवली पाहिजे. शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिका मांडलेली नाही.
मला आता त्यांना आव्हान करायचं आहे की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी गॅरंटी घ्यावी ना, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या का झाल्या? याचं उत्तर संजय राऊत देतील का? उगाच शेतकरी प्रश्नावरुन राजकारण करायचं ही गोष्ट सोडली पाहिजे. शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने आधी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे असंही फडणवीस म्हणाले.