
मुंबई: राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला यश आले आहे. आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत या शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्यासाठी 1 हजार 160 कोटींचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी आज माध्यमांना बोलताना दिली.
लवकरच जीआर काढणार
केसरकर म्हणाले, चाळीस टक्क्यांवरुन साठ टक्क्यांवर पात्र ठरलेल्या शिक्षकांचा जीआर लवकरच निघेल. पुढच्या आठवड्यात हा सविस्तर प्रस्तावाची छाननी केली जाईल आणि जीआर काढू. एकंदरीत पात्रता पूर्ण करू शकल्या नाही अशा शाळा वगळून आम्ही सर्वच्या सर्व शाळांना मान्यता देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या मागण्या केलेल्या नव्हत्या, अशा लोकांनाही न्याय देणार आहोत.
वंचित शिक्षकांना मिळणार लाभ
केसरकर म्हणाले, शिक्षकांसाठीच्या पॅकेजबद्दलही ठरवले असून त्यावर चर्चाही झाली. याची घोषणा पावसाळी अधिवेशनात मी केली होती. तेव्हा मी सांगितले होते की, अनेक वर्षे जे शिक्षक वंचित राहीले आहे त्यांच्यासह सर्वांचे निर्णय होतील. अघोषित, त्रुटी यांच्यासह ज्यांना ग्रॅंट सुरू केले त्यांना पुढचा हप्ता तत्वतः मान्य केले आहे. त्याचा लाभ त्यांना मिळेल.
त्यांनीच मला घोषणा करण्याचे सांगितले
केसरकर म्हणाले, शिक्षकांनी जे मान्य केले त्यापेक्षाही जास्त त्यांना शासनाने दिले आहेत. आम्ही शिक्षकांना आंदोलन करू नका हे मी सांगितले होते. आम्ही विधानसभेत, विधान परिषदेत जी घोषणा करतो ती आमच्यावर बंधनकारक असते, अन्यथा हक्कभंग होतो. कॅबिनेट बैठकीत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठलीही घोषणा करता येत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मी घोषणा करीत आहे. त्यांनीच मला घोषणा करण्याचे सांगितले.
साठ हजार शिक्षकांना लाभ
केसरकर म्हणाले, लाभार्थी शिक्षकांची संख्या साठ हजार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. अनेक शिक्षक बारा ते पंधरा वर्षांपासून न्यायापासून वंचित राहीले होते. या शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. 1 हजार 160 कोटी रुपयांची तरतूद आम्हाला करावी लागली आहे.