छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेवक तसेच इस्लाम पार्टीचे पदाधिकारी रफत यार खान Rafat yar khan attack यांच्यावर जुना बाजार भागात गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात ते अक्षरश: रक्तबंबाळ झाले. हल्ल्यानंतर सिटी चौक ठाणे आणि घाटीत प्रचंड गर्दी जमली होती. काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. हा हल्ला कोणी केला? याचा पोलीस शोध घेत आहेत.
मिनाज खान अब्दुल जलील खान आणि रफत यार खान यांच्यात २० मार्च रोजी वाद झाला होता. सिल्लेखाना चौकात रफत यांनी मिनाज यांना शिवीगाळ करून आज तेरा काम पक्का करना है, अधी धमकी देत फायटरने तोंड आणि डोक्यात मारले होते. या प्रकरणी २४ मार्च रोजी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, २६ मार्च रोजी रफत यार खान हे गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सिटी चौक ठाण्यात गेले होते. तेथून ते मिल कॉर्नरकडे परतत असताना जुना बाजार भागात गाठून टोळक्याने त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. दरम्यान, ही माहिती मिळताच उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ आणि मिल कॉर्नर भागात बंदोबस्त वाढविला. सोबतच, हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.






















































































































































































