
मुंबई: विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता विरोधी पक्ष व नंतर मित्रपक्ष संपवून वन नेशन, वन पार्टीकडे वाटलाच सुरु झालेली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Vasantrao Sapkal यांनी केला आहे.
निवडणूक निकालावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुका या लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडल्या पाहिजेत. पण मागील काही वर्षापासून निकोप निवडणुकीचे चित्र दिसत नाही. सत्ताधारी भाजपा महायुती सत्तेच्या गैरवापर करून निवडणुका जिंकत आहे, त्यांच्या मदतीला प्रशासन व निवडणूक आयोग आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे उमेदवार पळवणे, त्यांचे अर्जच बाद करणे किंवा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणे, असे प्रकार सर्रास होत आहेत, ते विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसले. भाजपा स्वतःला शक्तीशाली पक्ष म्हणवतो पण त्यांच्याकडेही उमेदवारही नाहात म्हणून दुसऱ्या पक्षातून फोडाफोडी करावी लागते. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान रक्षणासाठी निवडणुका लढतो पण सत्तेच्या व पैशाच्या जोरावर निवडणुकीत धुडगुसु घातला आहे. प्रत्येक मतदाराला ५-५ लाख रुपये व इतर आमिषे दाखवण्यात आली. सत्ताधारी पक्षाचा विजय हा सत्तेचा व पैशाचा माज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ नसले तरी लोकशाही व संविधान रक्षणासाठी आमची ही लढाई सुरु आहे. नागपूर मध्येही संख्याबळ नव्हते तरिही एका वैचारिक लढाईच्या भूमिकेतून अतुल लोंढे यांनी निवडणूक लढविली. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची समिक्षा वरिष्ठ नेत्यांची एक समिती लवकरच करेल, असेही सपकाळ म्हणाले.






































































































































