मुंबई:निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन सुरू केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ Abhijeet Sapkal यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात SIR अभियानाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी अभिजीत सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची आणि लोकशाही प्रक्रियेशी निगडित बाब असल्याने काँग्रेस पक्ष या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे. अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर BLA नियुक्त करण्यात येणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी तसेच विधानसभा उमेदवारांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजित सपकाळ यांनी याआधी प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यातही काँग्रेसच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे.


































































































































