माणुस’की’ चा विजय असो..

संदीप काळे यांचे नवे पुस्तक आपल्या भेटीला...

May the victory of manuski
माणुस'की' चा विजय असो.. संदीप काळे यांचे नवे पुस्तक आपल्या भेटीला.. . May the victory of manuski

जन्म कुठे घ्यावा हे आपल्या हातात नसते. पण मिळालेला जन्म आपल्या कर्माने माणूस सार्थकी लाऊ शकतो. हेच आपल्या देशातील कर्तबगार व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावर नक्कीच लक्षात येते. 

वर्षानुवर्षे कोळशाच्या खाणीत हिरा पडून असतो. त्याला पारखणारी नजर ही फक्त जोहऱ्याकडेच असते. दुधातून पाणी वेगळे काढण्याचीही किमया फक्त राजहंसाकडेच असते. गुलाबाला काट्यांचा सहवास लाभूनही तो त्याचे उमलने सोडत नाही. रातराणींच्या फुलांना आपला सुगंध दरवळावा म्हणून आटापिटा करावा लागत नाही. तो हवेसोबतच दूरवर पसरतो. असेच  एक व्यक्ती ज्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्यांच्या भ्रमंती लाईव्हमुळे अनेक लोकांचे जीवन कार्य,वेगळेपण समोर आले. पेपरनंतर, त्याच भ्रमंती लाईव्हचे आज  माणुस’की’ या पुस्तकरूपाने अमूल्य अशी भेट वाचकांना मिळाली आहे.

संदीप रामराव काळे यांचे माणुस’की’ हे पुस्तक, त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत, त्या  सगळ्यां पुस्तकावर भारी पडणारे हे पुस्तक नुकतेच सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. काय असते माणुस’की’? किती मोठा प्रश्न आहे. परंतु त्या एकाच प्रश्नाचे उत्तर आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकते याचे मूर्तिमंत उदाहरणे या पुस्तकात दिसून येतात.

आपल्याला समोर फक्त तेच लोक दिसतात ज्यांचे नाव कुठेतरी प्रसिद्ध आहे. परंतु त्यांचे काय ज्यांच्या नावापुढे कधीच प्रसिद्धीचे वलय नसते. अशीही काही लोक आपल्या आजुबाजुला आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात वेगळया वाटा निवडून आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित केला आहे.

या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण माणसाला एक वेगळा विचार करायला लावते. प्रत्येक वेळी माणसाला किती वेगवेगळी लोक भेटतात, त्या प्रत्येकांची विचार करण्याच्या पद्धती किती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे संदीप काळे फिरले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना एक नवीन वेगळेपण असलेला विषय शोधला आणि तोच विषय त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवला आहे.

 पहिल्याच प्रकरणात आई आणि मुलीच्या जिद्दीची गोष्ट आहे, गोष्ट म्हणण्यापेक्षा धडा म्हटलेला बरा. एक आई आपल्या मूकबधिर मुलीला शिकवण्यासाठी किती कष्ट करते प्रसंगी तिचे तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. कुटुंबातील इतर व्यक्ती तिचा नवरा आणि मुलगा यांचीही तिला पूर्णपणे साथ मिळाली आहे. आई उर्मिला आगरकर आणि  मुलगी मानसी आगरकर यांनी जगण्याची एक नवी उमेद अनेक जणांना दाखवून दिली आहे. उर्मिला आगरकर यांची जिद्द मानसीला एक नवी दिशा मिळून देत आहेत. उर्मिला ताई यांनी मानसीच्या मूकबधिर असल्याबाबत तीन वर्षांनंतर कळले. परंतु त्यांनी हार नाही मानली. त्याच जिद्दीमुळे आज मानसी आत्मविश्वासाने जगते आहे. उर्मिला ताई यांनी असे सांगितले ” माझी मुलगी इतर धडधाकट मुलांप्रमाणेच वावरली पाहिजे, जगली पाहिजे त्यासाठी मी वाटेल ते करीन, ‘ या जिद्दीने उर्मिला कामाला लागल्या.’ तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, या सहानुभूतीखाली कुठल्याही पद्धतीची भीक माझ्या पोरीला नको. कोणाच्याही मदतीशिवाय ती आपल्या आयुष्यात खंबीरपणे  उभी राहून जगली पाहिजे. ‘ हीच त्यांची भूमिका आज त्यांना खूप यश मिळवून देत आहेत. आज त्यांचे कुटुंब अगदी कोणालाही दोष न देता आनंदाने जगत आहेत आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देत आहेत. त्यांना जे मिळाले ते अनमोल आहे. हा खरा ‘ आतला आवाज ‘ आहे.

लातूर दौर्‍यावर असताना अशीच संदीप काळे यांना  एक वेगळा विषय दिसतो. तिथल्या जुन्या एमआयडीसी परिसरात एका बाजूला भली मोठी रांग दिसली. तिथे नाना प्रकारचे लोक होती. तर ती रांग होती व्यसन सोडवण्यासाठी आलेल्या लोकांची. अनेक लोक इथे व्यसन सुटेल या आशेने येतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या पदरी निराशा येत नाही. असे हे व्यसनमुक्ती केंद्र आहे ते ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’च आणि तेथील सर आहेत ते विजयकुमार यादव, हजारो लोकांना व्यसनाच्या खाईतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यादव  यांना यश आले आहे. अनेक रुग्ण इथ मोफत राहतात, त्यांच्या खाण्याची, औषधपाण्याची व्यवस्था केंद्रातर्फे केली जाते. दारूचे व्यसन कुणाला कधी लागते, कुणामुळे लागते, कुणी त्यालाच आपले आयुष्य मानतात. ‘ ती’ सोडत नाही म्हणुनच आपल्यालाही तिला सोडणे अवघड जाते. परन्तु अशा लोकांसाठी विजयकुमार यादव हे देवदूत आहेत. त्या देवदूताची ही कथा.

एकदा कार्यालयीन कामासाठी पुण्याला गेले असताना संदीपला एक वेगळा आनंद देणारा उपक्रम गवसला. कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थ भागात एक आनंदघर उभे आहे. छाया गोलटगावकर यांचे हे ‘आनंदघर” हा एक वेगळा आणि आताच्या जगाला खूप गरजेचा असा हा उपक्रम. ज्याची आपल्याला नव्याने माहिती मिळते. छाया या पुण्यातील नामवंत वकील असूनही त्यांनी वेगळा मार्ग हा आनंदघरच्या माध्यमातुन का निवडला? याचे आपल्याला उत्तर मिळते. कायदा, व शिक्षण या एकत्रित, व्यापक अभ्यासाचा एक भाग यातून ”आनंदघर बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर ” 2015 मध्ये सुरू केले. हे फक्त पाळणाघर म्हणून मर्यादित न राहता त्याही पेक्षा पुढे जाऊन इथे खूप काही नवीन शिकायला मिळते.’ फुलांना समजून घेताना ‘आपल्याच राज्यातील हा एक यशस्वी झालेला प्रयोग याबद्दल वाचायला मिळेल.

रामभाऊ इंगोले ‘ एक स्वतंत्र चळवळ चालवणारा माणूस आणि अतिशय मोलाचं – महत्वाचं काम करणारा माणूस ‘ रामभाऊं सारखी काम करणारी खूप कमी माणसे असतिल. इतक्या मोठय़ा कामाची देशपातळीवर कुठेही नोंद केलेली नाही याचे आश्चर्यच म्हणावे लागेल. रामभाऊ यांचे काम यासाठी वेगळे म्हणावे लागेल कारण, वेश्या व्यवसाय करणार्‍या वस्तींकडे माणूस  ‘ विकृत ‘ नजरेने पाहतात परंतु रामभाऊ यांनी ‘माणुसकीच्या दृष्टी’ ने पाहिले. आणि यातूनच एका नवीन चळवळीचा उदय 1980 पासून सुरू झाला. आणि आजतागायत ही लढाई सुरू आहे. रामभाऊ यांनी अनेक  जणांची पालकत्वाची जबाबदारी पार पाडली आहे ते पण यशस्वीरीत्या. अनेक मुलींचे लग्न लावून दिले आहे. आतापर्यंत किती मुले इथे आली याचा आकडा रामभाऊ यांनाही सांगता येणार नाही. यापैकी कुणी डॉक्टर झालेत, कुणी इंजीनिअर झालेत तर कुणी आपला उद्योग सुरू केला. रामभाऊ सांगतात “आमच्याकडे आलेला एकही मुलगा गेल्या 39 वर्षात उपाशी राहिलेला नाही किंवा शिक्षणापासून वंचित राहिलेला नाही.” हे रामभाऊ मोठय़ा अभिमानाने सांगतात. अशाप्रकारे वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांच्या लेकरांना ‘ बापा ‘ सोबत मिळालेले ‘घरपण ‘आहे.

 जातीच्या फेर्‍यातून माणूस मेल्यानंतरच सुटतो. तोपर्यंत ती जळू सारखी चिटकून राहते.’ जात नाही ती जात ‘आणि अशी ही जात राज्याच्या ग्रामीण भागात पावलोपावली दिसून येते. अशाच एका वैदू समाजातील 22 वर्षीय साहसी मुलीची कथा आहे. दुर्गा गुडूले. कित्येक कुटुंबांना वाळीत टाकण्याचे काम या जातपंचायतीने केले. याच जातपंचायतीच्या विरोधात जाण्याचे तिने धाडस केले. परिणाम असा झाला की, आज जातपंचायतीचे अस्तित्व शंभर टक्क्यांवरून दोन  टक्क्यांवर आले आहे. अशा या धाडसी दुर्गाचा संघर्ष या ‘जात पंचायती कर्दनकाळ ‘ या प्रकरणात आहे.

संदीप काळे यांचे गुरू,  प्रा. सुरेश पुरी यांच्याविषयी एक प्रकरण आहे. सन 1980 ते 2010 या काळात प्रा. सुरेश पुरी सर ऊर्फ बाबा हे ‘जबराट’ जनसंपर्क असलेले पत्रकारितेच्या शाळेतले हेडमास्तर. आपल्या पत्रकारितेच्या 30 वर्षाच्या कालावधीत चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं पालकत्व स्विकारुन, त्या मुलांचे शिक्षण, नौकरी आणि संसार मार्गी लाऊन देणारा हा ‘बाप’ माणूस. हिंदीच्या प्रसारासाठी अनेक ठिकाणी प्रा. सुरेश पुरी यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बाबा म्हणतात ” गरिबांची, बहुजनांची पोरं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत. त्यांना उभं राहताना पाहिलं की आयुष्य वाढतं रे… मी काय, पिकलं पान… कधीही गळून जाईन ; पण आयुष्यात उभी राहिलेली पोरं इथं गरिबीचा अंधकार दूर करतील. काळ कुणासाठी थांबत नाही. काळाचा आशीर्वाद कुणाला कसा मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे चांगला काळ येण्यासाठी तरूणाईला मदत केली पाहिजे. “

असे हे सर म्हणजे ‘न थकलेला बाप’. 

 शिक्षक हा मातीच्या गोळ्यांना आधार देण्याचे काम करतो. त्याने ठरवले तर काय एक तो करू शकत नाही. सर्वकाही करू शकतो. अशाच एका शिक्षकाने शाळेमधे खूप मोठे परिवर्तन घडवून आणले. नांदेड जिल्ह्यातल्या कमळे वाडीच्या विद्यानिकेतन शाळेत देशाच्या सामाजिक स्वास्थ्याची काळजी असणार्‍या एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाने केवळ कमळे वाडीच्याच नव्हे, तर राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या कमळे वाडीच्या विद्यानिकेतनच्या या शिक्षकाचे नाव आहे शिवाजी आंबुलगेकर. लेखक त्यांना फुंसुख वांगडू संबोधतात.

 विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करून घेतले जातात. शालेय प्रार्थनेच्या वेळी परिपाठ टाळून निवडलेल्या ग्रंथातील दररोज एक उतारा वाचला जातो. अनुवाद काय असतो ते इथल्या लेकरांना सांगण्याची आवश्यकता नाही कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची मातृबोली वेगवेगळी असल्यामुळे ते स्वताच्या भाषेत अनुवाद करतात. घोकंपट्टीपेक्षा जगण्यासाठी प्रचंड लळा लावणारे शिक्षण इथे दिले जाते.

 तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्य़ातील शाळा ता. सेनगाव येथील एका शिक्षकाने विद्यार्थी शाळेत का येत नाही याचे कारण जाणून घेऊन त्यांची अडचण कशी सोडवता येईल यासाठी कशी धडपड केली आहे. सामाजिक माध्यमांचा वापर करून शेतकर्‍यांच्या झेंडूच्या फुलांना कसा भाव मिळून दिला याची एक वेगळी कहाणी लेखकानी सांगितली आहे. आणि रडणारी झेंडूची फुले एक दिवस शिक्षकाच्या प्रयत्नातून ‘ हसलेली झेंडूची फुले झाली.’

पुढील प्रकरणात ‘हिरवाई पेरणारे प्रकाशदूत’ यामधे विजय  लोहकरे  आणि प्रकाश पाटील यांनी शेतीत कसे यशस्वीरीत्या प्रयोग केले. विजयची यशोगाथा शेतीपासून दूर पळणार्‍या तरुणाईला प्रोत्साहित करणारी आहे. त्याचसोबत दिनेश देशमुख यांची परिसरात’  आदर्श शेतकरी’ अशी ओळख आहे.

काही तरुण मुले किती वेगळा विचार करू शकतात याचे योग्य उदाहरण म्हणजे पुण्यातील काही तरुण तरुणी एकत्र येऊन गरजू लोकांना अन्नदान करतात. आणि हे काम 12 महिने अविरत सतत सुरू राहते. ज्या भागात अन्न शिल्लक राहते तेथील अन्न गोळा करून आणणे आणि ते कसे गरजू लोकांपर्यंत पोहचवता येईल त्यासाठी ही तरुणाई कशी धडपड करतात. एकीकडे तरुणाई सैरभैर झालेली आपल्याला दिसते आणि दुसरीकडे हीच तरुणाई वेगळेही काही करू शकतो याविषयी ‘पुण्याचं काम’ या प्रकरणात लेखकानी सांगितले आहे.

 सुरेखा पुणेकर यांच्यानंतर कुणी जर तमाशा मध्ये  नाव केले असेल तर त्या म्हणजे स्मृती बडदे आणि ऐश्वर्या बडदे या दोघी बहिणी. दोघींचीही लावणी अप्रतिम. त्या दोघींनीही  लावणी जगवली आहे. गावात बडदे कुटुंबाची पाटिलकी आणि पाटीलकी असताना लावणी करण्यास त्यांना कधीच परवानगी मिळाली नव्हती. तरीही त्यांच्या विरोधात जाऊन दोघीही बहिणींनी आपल्या अंगी असलेल्या कलेचा सन्मान केला. महाराष्ट्रातील लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. अशी या बहिणींची  अफाट संघर्षाची यशस्वी गाथा लेखकांनी ‘तमाशातील पाटीलीण’ या प्रकरणात सांगितले आहे.

भटकंती करणारा समाज म्हणजे आपण ज्याला भटक्या विमुक्त जाती व जमाती असे संबोधत असतो. सर्वात खडतर जीवन असेल तर यांचे. कारण रोज काम मिळाले तरच संध्याकाळी जेवायला मिळणार नाहीतर तसेच उपाशी झोपावे लागणार. त्यांचे लेकरं, त्यांचे शिक्षण याबद्दल विचार करणारे फार कमी आहेत. परंतु याच लोकांसाठी स्वतःचे जीवन झोकून देऊन काम करणारे काही लोक अजून जिवंत आहेत. याच लेकरांसाठी नांदेड मधील बार्शी तालुक्यात कोरफळे गावाच्या माळरानावर एक छोटीशी निवासी शाळा महेश निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी विनया निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरू झाली. जीवन आणि शिक्षण यांची उत्तम सांगड घातलेली संस्था म्हणजे ‘स्नेहग्राम’ संस्था. भटक्या जातीच्या व जमातीच्या लेकरां कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना कोणी चोरी करणारा तर कोणी भीक मागणारा समाज समजतो. परंतु ‘स्नेहग्राम’ मधील लेकरांनी हे सगळे समज खोडून टाकले आहेत. परंतु हे सगळे शक्य झाले आहे ते केवळ महेश आणि विनया यांच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे एकदा तरी या शाळेला भेट द्यावी अशीच ही शाळा आहे.

 ‘वंचितांच्या हातांना, गंध पुस्तकांचा ‘ अशी ही ‘स्नेहग्राम’ संस्था. 

सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते म्हणजे ‘रक्तदान’. कारण या दानामुळे किती जणांचे जीव वाचतील याचे आपण अंदाज ही बांधू शकत नाही. कित्येक लोकांचे प्राण रक्तावाचून जातात. असेच एक श्रेष्ठ रक्त दानकरी आहेत. ज्यांनी वयाच्या पन्नाशी पर्यंत शंभरवेळा रक्तदान केले आहे.

 असे हे व्यक्ती आहेत डॉ. सुरेश हनमंते. ज्यांनी त्याच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगामुळे स्वतःला या कामात अगदी झोकून दिले आहे. ‘पन्नाशीतील शंभरी’ सगळ्यानी वाचावी अशी ही डॉक्टरच्या दातृत्वाची कथा आहे.

 “आम्ही भिकार्‍यांचे डॉक्टर ” अशी संकल्पना कुठे ऐकिवात नाही. कारण भिकार्‍यांना आजच्या जगात कोण विचारते. भिकारी आहेत, भिकारी म्हणून सोडून देतात. परंतु यांच्यासाठी काम करणारे काही लोक अजून आहेत. डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनीषा सोनवणे यांनी आपले सर्व जीवन त्यांच्या सेवेला वाहून नेले आहे. भिकारी आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळी वागणूक असे कधीच घडले नाही आतापर्यंत. मुळात त्यांनी त्यांच्यासाठीच काम करण्याचे ठरविले आहे. हे दाम्पत्य फक्त भिकार्‍यांच्या आजारांचे निदान करत नसून त्याही पलीकडे जाऊन खूप काही करतात. त्यांना नीटनेटके करणे, त्यांच्या वर उपचार करणे, शस्त्रक्रिया करणे, कुणाला वृद्ध आश्रमामध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या कुटुंबियांना खुशाली कळविणे, भिकार्‍यांना व्यवसाय उभा करून देणे असे कितीतरी कामे ही दाम्पत्य करत असतात. केवळ आणि केवळ त्यांच्या माणुसकी मुळे. ‘ भिकार्‍यांचे तारणहार ‘ असे हे दोघही जण.

वर्ध्यापासून सात किलोमीटर अंतरावर रोठा  नावाचे गाव आहे. या एका छोट्याश्या गावात ‘संकल्प प्रकल्प ‘ आहे. मंगेशी मून ह्या आपल्या प्रकल्पावर अनेक उपक्रम राबवतात. हा प्रकल्प त्यांनी पारधी आणि भटक्या समाजांच्या मुलांसाठी चालू केला आहे. या मुलांविषयी मंगेशी यांना खूप आस्था आहे. सुरुवातीला त्यांना किती अडचणी आल्या. परंतु त्या अडचणींवर मात करून या मुलांच्या आयुष्यात त्यांनी कशी पणती तेवत ठेवली आहे.

त्यांच्या या प्रकल्पात दरवर्षी मुलांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम आणि आईसारखी माया करण्याचे काम मंगेशी मून या सतत करतात. म्हणूनच लेकरांसाठी आई पेक्षा त्या कमी नाहीत. अशी ही  ‘उमेद माणुसकीची’.

 एकदा सातारा जिल्ह्यातील बातमी वाचताना लेखकांना एका नवीन मोहिमे बद्दल कळाले. ‘ लेक शाळेत पाठवा’ असे त्या मोहिमेचे नाव. मोहीम म्हणण्यापेक्षा ही एक चळवळ आहे. आणि या चळवळीचे नेतृत्व प्रा. डॉ. सविता गीरे पाटील करतात. ग्रामीण भागात मुलींची संख्या आधीच कमी असते आणि शिक्षणाचा तर दूर दूर गंधही नाही. तिथल्या मुली शिकल्या पाहिजेत या काळजीतून त्यांनी ही चळवळ सुरू केली. प्रा. डॉ. सवितागीरे पाटील गावा गावात जाऊन आपल्या उपक्रमा विषयी माहिती देतात.

कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर ते अवघडच आहे. पण प्रा. डॉ. सविता यांच्या नेतृत्वाखाली सगळे काही व्यवस्थित आहे. आणि चळवळीला भरपूर पाठींबा मिळत आहे. अशी ही लेकीने केलेले ‘लेकीसाठीचं कर्तव्य ‘आहे.

आजकाल शिक्षणाची गोडी कमी झाली. कुणाला रस वाटत नाही आहे. कदाचित आपल्या इथल्या शिक्षण पद्धतीमुळे हे घडत असावे. शिक्षणाची गोडी लागावी अस काहीच कुठल्याच शासनाच्या उपक्रमात नसते आणि परिणामी त्याची गोडी नष्ट होत जाते. परंतु हीच शिक्षणाची गोडी नष्ट होऊ नये म्हणून अविरतपणे शिल्पा खेर बाई सतत प्रयत्न करत असतात. शिल्पा बाईंची शिकवण्याची शैली पाहून चांगले चांगले अवाक् होतात. मुंबईमधील अनेक शाळांवर शिल्पा बाईंनी जादूची कांडी फिरवली आहे. त्यांचे स्वतःचे असे  ‘भाग्यश्री फाऊंडेशन ‘ आहे. या फाऊंडेशन अंतर्गत त्यांनी अनेक असे उपक्रम राबवले आहेत. तरीही त्यांना ‘नापास मुलांची बाई ‘ का म्हणतात एकदा आवर्जून वाचायला हवे.

‘मास्तर आणि मास्तरीणबाई ‘ या लेखामधे गोपाल खाडे आणि नीता तोडकर – खाडे या शिक्षकांनी राबविलेले प्रयोग आहेत. अतिशय खेड्यातील विद्यार्थी आहेत त्यांच्यात रमून हे दोघही शिक्षक कसे त्यांना घडवत आहेत. यांचे मूर्तिमंत उदाहरण या लेखात आहे. अनेक उपक्रमात गोपाल खाडे मुलांत रमतात, आणि प्रयोग करतात. आणि तसेच नीता तोडकर- खाडे यांच्याही मार्गदर्शनाखाली चालतात. वेगळा प्रयोग सांगायचा म्हटले तर, वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांंना दिले जातात आणि मूल त्यावर दहा दहा कविता तयार करतात. याच्यातून विद्यार्थ्यांच्या मेंदूला एक नवीन चालना मिळते. अशी ही शाळा आणि येथील प्रयोगशील शिक्षक.

‘इंदूमाई ‘ ही एक अतिशय वेगळी कहाणी लेखकानी सांगितली आहे. वडापाव खरतर मुंबईचा चालता बोलता खाता येणारा पदार्थ. आणि पोट भरेल असा. मात्र ‘इंदूमाईनी’ याच्यातही वेगळेपणा शोधून आपला नवीन वडापाव चा व्यवसाय सुरू केला. इंदूमाईं च्या वडापाव मध्ये एक वेगळी चव आहे. भिकार्‍यांना ही इंदूमाईं त्यांचा वडापाव देतात. अगदी छोट्या गाड्यावरून  सुरू झालेला इंदूमाईंचा हा प्रवास सातासमुद्रापार पोहोचला आहे. भुकेलेल्यांनी प्रेमाने इंदूमाईंना माई ही पदवी दिलेली आहे. अनेक पुरस्कार मिळालेली इंदूमाईंची कथा वाचावी अशीच आहे.

अनेकदा आपल्याकडे सर्वकाही असते. तरीपण आपल्या जीवनाविषयच्या तक्रारी काही संपत नाहीत. देवाच्या कृपेने सर्वकाही नीट, शरीराने चांगले अगदी कुठलेही व्यंग नाही. तरीपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नसतो. अशाच दिव्यांग मुलांवर असलेली एक कहाणी आहे. ‘दीपस्तंभ फाऊंडेशन ‘ ही संस्था दिव्यांग मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. यातील महेंद्र निगडे, माऊली अडकूर, स्वप्निल बागूल, पंकज गिराशे आणि चैताली पातावर यांच्या जिद्दीची  ही गोष्ट आहे. माणसाला विचार करायला भाग पाडणारी आहे. जे सतत नकारात्मक विचार करतात त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. या पाच जणांनी ‘पंखांविना भरारी’ कशी घेतली आहे. हे नक्की वाचायला हवे.

आपल्या महाराष्ट्राला अनेक अशा पुरोगामी चळवळी लाभल्या आहेत. चळवळीचा भाग झालेल्या व्यक्तीच्या जीवनातील बदल कसा असतो. याचे उत्तम असे दर्शन लेखकाने घडवून दिले आहे. काही उच्चशिक्षित लोक कसे चळवळीकडे वळले आहेत. डॉ. सुगन बरंठ, बुद्धप्रिय कबीर यांनी चळवळींना वाहून घेतले आहे. त्याचबरोबर ऋषिकेश सकनूर आणि महेश गुंड ही तरुण मंडळी का चळवळींकडे वळली आहेत. आज या तरुणाईला चळवळ का महत्वाची वाटते हे या प्रकरणात वाचायला मिळेल. अशी ही ‘चळवळीची चाकं’.

आपल्या भारतात सगळ्यात मोठी संताची परंपरा लाभली असेल तर ती आपल्या महाराष्ट्राला. सगळ्यात जास्त संत कुठे झाले असेल तर ते आपल्या महाराष्ट्रात. त्यापैकी कुणाचे साहित्य उघडकीस आले तर त्यापैकी कुणाचे नाही. अशीच एक संत, कवयित्री होऊन गेली ती म्हणजे संत बहिणाबाई चौधरी. परंतु संत बहिणाबाईंच्या ‘ अरे संसार संसार’ या पलीकडे काही माहिती नाही. संत बहिणाबाई यांचे माहीत नसलेले साहित्य लोकांपुढे आणण्याचे काम अनुराधा गानू या करत आहेत. बहिणाबाई चौधरी यांच्यावर नाटके बसवून त्यातून येणारी रक्कम शेतकर्‍यांना मदत म्हणून द्यायची. आणि विशेष म्हणजे त्या स्वतः अमेरिकेत सीए होत्या तरीपण त्यांनी या कामासाठी स्वतःला झोकून दिले. स्वतः मात्र व्हीलचेअर बसूनच सर्व काम पूर्ण करतात.   स्वतःकडे दुर्लक्ष करून त्यांनी या कामासाठी स्वतःला वाहून नेले.

बहिणाबाई यांना ‘सरसोती’ म्हटले जाते. आजच्या या ‘सरसोती’ अनुराधाताई गानू यांच्या बद्दल नक्की वाचायला हवे

आजकाल बेरोजगारी खूप वाढली आहे. सगळीकडे आता हे दृश्य सामान्य झाले आहे. नौकरी सगळ्यांनाच आवडते परंतु ती लागणे पाहिल्या पेक्षा आताच्या काळात लागणे सर्वात अवघड होऊन बसले आहे. विद्यार्थी परीक्षा देऊन देऊन बेजार झाले आहेत परिणामी वय वाढत चालले आहे. कुठे कमी पडत आहोत याचे उत्तर शोधायलाही वेळ नाही कुणाकडे. आणि वेगळे काही करण्याची हिम्मत होत नाही.

परंतु वेगळे करण्याची हिम्मत धनंजय राऊत यांनी दाखवली आहे. चंदनाची शेती करून या तरुणाने वेगळा प्रयोग करून दाखवला आहे आणि इतरानाही त्याने रोजगार प्राप्त करून दिला आहे. आणि लेखकांच्या गावातील पाटनूर येथील युवकाने चार चार पदव्या असून, योग्य दिशा नाही मिळाली म्हणून आत्महत्या केली. लेखकांनी दोन तरुणाई बद्दल असलेला विरोधाभास दाखवून दिला आहे. अशी ही कथा ‘कल्पकतेचा सुगंध चंदनापरी’ विचार करायला भाग पाडणारी आहे.

‘मराठीतील हॅरी पॉटर’ जर कुणाला म्हटले तर वावगे वाटू देऊ नये. कारण या प्रकरणात लेखकानी बालसाहित्यिका बद्दल लिहले आहे. असे दुर्मिळ वेळा बघायला मिळते. अशा या लेखकाचे नाव ‘नचिकेत मेकाले’ आहे. वय वर्षे 15 असलेल्या मुलाने एका वेगळया धाटणीची कादंबरी लिहिली. ‘नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टीचे रहस्यमय जग’. रहस्यकथा माणसाला एका वेगळया विश्वात घेऊन जातात. असे वर्णन लेखक या कादंबरीचे करतात. आणि खरे टॅलेंट ग्रामीण भागातच आहे हे दाखवून देतात.

आई प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे. त्या विषयावर जितके लिहावे तितके कमी पडते. कारण तो विषयच असा आहे. प्रत्येकाच्या मनातील विश्वासाचा विषय आहे. आई सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अशीच  एक कथा लेखकांनी  यामधे एका कवयित्री बद्दल सांगितले आहे. खामगावच्या कवयित्री ‘ कविता रमेश आटोळे ‘ असे त्यांचे नाव. आईच्या आठवणीनी हळव्या झालेल्या कविता ताई यांनी आईवरच्या कवितांची तब्बल 14 पुस्तके काढली. आईबद्दल असलेल्या सगळ्या भावना त्यांनी पुस्तके काढून साचेबद्ध केल्यात. आणखी आईविषयी त्या साहित्य काढण्याच्या तयारीत आहेत. अशा या आई बद्दल प्रचंड प्रेम असणार्‍या कविता ताई बद्दल वेगळी कहाणी ‘ आई तुझी आठवण येते’.

शेवटची कथा म्हणजे सगळ्या कथांमधे वेगळी असलेली कथा  ‘ पिंपळेगावची सावित्री’. पाश्चिम महाराष्ट्रातील छोटेसे हे गाव. तिथली  ही सावित्री म्हणजे वर्षा पोमण. आपण पुराणातील सावित्रीची कथा ऐकली आहे. परंतु ही एका वर्तमानातील सावित्रीची कथा आहे.

वर्षा आणि संजय दोघेही मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. त्यांना दोन मुले. दोन एकर जमीन परंतु त्याचातही काही पिकत नाही. वर्षभरापूर्वी संजय आजारी पडलेत. खूप दवाखाने केले परंतु काहीही उपयोग झाला नाही आजार जशास तसाच राहिला. अनेक अडीअडचणीला सामोरे जाऊन वर्षां बाईनी संजय यांना मृत्यूच्या दारातून  बाहेर काढले. अशी ही साहसाची कथा लेखकाने आजच्या काळात घटस्फोटित होण्याचे प्रमाण वाढले असताना वर्षा आणि संजय यांच्या प्रेमाचे अनोखे नाते दाखवून दिले आहे.

असे हे सव्वीस कथांचे पुस्तक “माणुस’की’ ” संदीप रामराव काळे यांनी आपल्यापर्यंत आणले आहे. या पुस्तकाला प्रा. डॉ. माया पंडित (हैद्राबाद) यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाची पाठराखण प्रा.डॉ.मथुताई सावंत यांनी केली आहे. प्रत्येक कथा माणसाच्या हृदयातील माणुस’की’चा ठाव घेते. पुस्तकाचे मुखपृष्ठ बनविणारे नयन बारहाते यांनी सुद्धा माणसाला वेगळा विचार करण्यास भाग पाडले आहे. लेखकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढला व त्यानंतर या माणुस’की’च्या वेगवेगळया कथा जन्मास आल्यात. लेखक हे पत्रकार  असून माणुस’की’ जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत.

ते खरोखरच आनंददूत आहेत. समाजातील परिवर्तन त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातुन वाचकांपर्यंत पोहचविले. प्रत्येक कथा वाचनीय आहे. लेखकांनी उत्कृष्ट अशी भाषाशैली वापरली आहे. सहजसोपी, साधी सरळ सगळ्यांना समजेल अशी आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे.

माणसाला माणुस’की’ च्या नात्याने बघण्याचा हा प्रवास आहे…

धन्यवाद!!!

प्रिती सुदाम कांबळे.

पुस्तक; माणुस’की’

लेखक; संदीप रामराव काळे

प्रकाशन; सकाळ प्रकाशन

किमंत :२४०

पाने: १९९

मुखपृष्ठ:नयन बारहाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here