मुस्लिम आरक्षण लाँगमार्चला तरुणांचा जोरदार प्रतिसाद!

मुस्लिम आरक्षण, संविधान बचावसाठी १३ ऑक्टोबरपासून निघालेला लाँगमार्च ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Strong response of youth to Muslim reservation long march!
Strong response of youth to Muslim reservation long march!

औरंगाबाद: मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) संविधान वाचवण्यासाठी मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या बॅनरखाली लाँग मार्च औरंगाबादहून शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाला. शुक्रवारी लिंबे जळगाव येथे मुक्काम करुन आज शनिवारी पहाटे फजरची नमाज अदा करुन लाँग मार्च दुपारी गंगापूर शहरात दाखल झाला. यावेळी लाँगमार्चमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी लाँगमार्चचे स्वागत केले. मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या बॅनरखाली  मुस्लिम आरक्षणासाठी सोबत असल्याची ग्वाही दिली. ठिकठिकाणी लाँगमार्चचे स्वागत होत असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मुस्लिम आरक्षण आणि संविधान वाचवण्याच्या उद्देशाने मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी लाँगमार्च औरंगाबाद येथून मुंबईसाठी रवाना झाला आहे. आमखास मैदानासमोरील जामा मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर अडीच वाजता लाँग मार्चला सुरुवात झाली होती. भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन लाँगमार्च पुढे निघाले.

शुक्रवारी रात्री लाँगमार्चचा लिंबेजळगाव येथे मुक्काम होता. महाराष्ट्र अल्पसंख्यांक परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार सिराज देशमुख या लाँगमार्चला मार्गदर्शन करत आहेत. याबाबत बोलताना जावेद कुरेशी म्हणाले की, लाँगमार्चअंतर्गत दररोज २० किमी पायी चालणार आहोत. दर २० किमीनंतर मुक्काम केला जाईल. त्या ठिकाणी नागरिकांसोबत बैठक होईल. मुस्लिम आरक्षणाची गरज आणि सद्यःस्थितीत संविधानाचे रक्षण करण्याची गरज याविषयी बैठकीत माहिती दिली जाणार आहे. २० दिवस प्रवास केल्यानंतर हा मार्च मुंबईत पोहोचेल, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष एड.सिराज देशमुख, प्रदेश मुख्य संघटक शेख मसूद, वाजेद खान, साजिद पटेल, शेख अफसर, हाफीज अली, मतीन पटेल यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित आहे. गंगापूरमध्ये समाजबांधवातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागताचा सिलसिला सुरुच असल्याचे दिसून येत आहे.  

लाँगमार्चचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत…

मुस्लिम आरक्षणासाठी निघालेल्या लाँगमार्चचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. विशेष म्हणजे लाँगमार्चचे युवक, वयोवृध्दांकडून जोरदार स्वागत होत असून जागोजागी पाठिंबा दर्शविला जात आहे. ही लढाई सर्वांची आहे. जोपर्यंत मुस्लिम समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढत राहू असा सकंल्प ठिकठिकाणी केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here