रंग आपुलकीचा..भावनेतील अंतर्मनाचा…

Bramanti-live-sakal-sandeep-kale-dr.narendra-borlepwar
Bramanti-live-sakal-sandeep-kale-dr.narendra-borlepwar

या  लॉकडाउनच्या काळात मुंबईचा खरा चेहरा अनुभवायला मिळाला. त्या दिवशी मी रेल्वेच्या डब्यातून एकटाच प्रवास करत होतो. कोरोनामुळे गर्दी नव्हतीच. ‘छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस’ला (सीएसटी) उतरलो. सीएसटीच्या अगदी समोर ‘पंचमपुरी’ची पुरी-भाजी खाण्याचा मोह झालाच. माझ्या टेबलवर एक गृहस्थ फोनवर बोलत होते. त्यांच्या बोलण्यात ‘नांदेडी’ भाषेचा टोन होता. फोनवरचं बोलणं झाल्यावर मी त्यांना विचारलं : ‘‘दादा, नांदेडचे का तुम्ही?’’ 

ते म्हणाले :‘‘हो.’’ 

आमच्या गप्पा सुरू झाल्या. अर्धा तास झाला. खाऊन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. 

ते गृहस्थ मला म्हणाले : ‘‘माझं ऑफिस शेजारीच आहे. तुम्ही याल का? मला खूप आनंद होईल.’’ 

त्यांच्या ऑफिसात पोहोचलो. ते ऑफिस नव्हतंच. ती एक ‘रंगशाळा’ होती. मला ऑफिसमध्ये घेऊन येणाऱ्या त्या गृहस्थांचं नाव डॉ. नरेंद्र बोरलेपवार (९९६७३३०६२१) होतं. ते चित्रकार आहेत. एका बंद खोलीचा दरवाजा त्यांनी उघडला आणि तिथली पेंटिंग्ज् मला दाखवली. एक चित्रकार अशी सगळ्याच प्रकारची चित्रं कशी काय काढू शकतो, असा विचार माझ्या मनात आला. मी त्यांना हा प्रश्न विचारणार तेवढ्यात तेच मला म्हणाले : ‘‘ही सर्व चित्रं माझी नाहीत. मी ही इतर चित्रकारांकडून विकत घेतलेली आहेत.’’ 

यांनी ही चित्रं विकत का घेतली असतील असं वाटून मी त्यांना विचारलं, तर ते मला म्हणाले :‘‘गेल्या चार वर्षांपासून अनेक चित्रकारांची चित्रं विकली जात नाहीत, त्यामुळे चित्रकार अडचणीत आहेत. त्यातच दीडेक वर्षापासून कोरोनाची महामारीही सुरू झाली आहे. ज्यांचं पोट केवळ चित्रांवर चालतं अशा अनेक चित्रकारांची चित्रं मी विकत घेतली. चित्रकारितेच्या कलेला दुय्यम स्थान दिलं जातं, त्यात मार्केटमधल्या अनास्थेची भर. या स्थितीमुळे अनेक चित्रकारांना नैराश्यानं वेढलेलं आहे. काही जण तर मरणाला जवळ करण्याचीही भाषा करतात. ते सगळं ऐकून मी हाताश झालो.’’

बोरलेपवार यांनी देशातल्या अशा गरजवंत चित्रकारांचा डेटा तयार केला व त्यांचे समुपदेशक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. हताश, निराश झालेल्या कित्येक चित्रकारांच्या संपर्कात ते आले. देशभरातून अनेक चित्रकार आपले गंभीर प्रश्न मांडण्यासाठी बोरलेपवार यांच्याकडे कसे येतात ते त्यांच्या ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांनी सविस्तर सांगितलं. 

मी बोरलेपवार यांना म्हणालो : ‘‘तुम्ही सर्व चित्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी काही करत का नाही?’’ 

बोरलेपवार हसले. त्यांनी किती तरी फाईल माझ्यासमोर ठेवल्या. मी त्या फाईल बारकाईनं पाहिल्या. बोरलेपवार यांनी देशातल्या सर्व चित्रकारांसाठी बारा वर्षांपूर्वी ‘द ग्लोबल आर्ट फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. चित्रकार सर्वार्थानं उभा राहिला पाहिजे, त्याची कला जगातल्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे या उद्देशानं सुरू केलेलं हे काम आज सातासमुद्रापार गेलं आहे.

बोरलेपवार म्हणाले : ‘‘आई-वडील आपल्या पाल्यांना चित्रकलेच्या क्षेत्रात जाऊ देत नाहीत. तिथूनच चित्रकलेविषयीच्या आपल्या नकारात्मक मानसिकतेला सुरुवात होते. याशिवाय, चित्रकाराबाबत समाजाच्या स्तरावर, शासनपातळीवर तर कमालीची उदासीनता आहे. ही उदासीनता दूर व्हावी यासाठी मी शासनदरबारी सतत पाठपुरावा करत आहे. चित्रकलेसाठी चांगलं वातावरण निर्माण व्हावं हा यामागचा उद्देश आहे.’’

बोरलेपवार हे नांदेडच्या कापसी (बुद्रुक) या गावचे. त्यांचे वडील वसंतराव शिक्षक होते. आई शांताबाई गृहिणी. भांड्यांवर नाव टाकण्याच्या कामापासून बोरलेपवार यांच्या कलेची सुरुवात झाली. मग ‘एमजीएम फाईन आर्ट’ मधून त्यांनी चित्रकलेची पदवी घेतली. पदव्युत्तर पदवी ‘सर जेजे उपयोजित कला महाविद्यालया’तून, तर मुंबई, नागपूर विद्यापीठातून पीएच. डी. केली आणि पुढच्या प्रवासासाठी त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत ‘आमदार निवासा’त राहून रात्री ते काम करायचे आणि दिवसा नोकरी शोधायचे. खूप परिश्रमांनंतर ‘सेंट जॉर्जेस रुग्णालयात’ आर्टिस्ट म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर नोकरी सोडून बोरलेपवार यांनी ‘सोरा मीडिया’  नावाची कंपनी सुरू केली. कलेच्या विविध पातळ्यांवर इथं असंख्य जण काम करतात. बोरलेपवार यांच्या दांडग्या जनसंपर्कानं ‘सोरा’नं देशपातळीवर काम केलं. 

‘‘माझं घरही शेजारीच आहे. तुम्हाला वेळ असेल तर जाऊ या घरी…’’ गप्पा मारता मारता बोरलेपवार म्हणाले.

आम्ही घरी गेलो. बोरलेपवार यांची पत्नी प्रांजली, मुलं अयान आणि रियान यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली. 

बोरलेपवार चित्रकारांसाठी करत असलेलं काम खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. गेल्या दहा वर्षांत त्यांच्यामुळे उभे राहिलेले चित्रकार असंख्य आहेत. भविष्यात या सर्वांच्या कलेला चालना मिळेल. चित्रकलेच्या शिक्षणाला प्रवेश घेण्यापासून ते परदेशात चित्रप्रदर्शन भरवण्यापर्यंतचे अनेकांचे किस्से बोरलेपवार यांनी मला सांगितले. या दोन्ही कामांबाबत अनेकांना मदत केली असल्याचं ते म्हणाले. 

चित्रकाराच्या भविष्यासाठी बोरलेपवार लढत आहेत. आपल्याला झालेला त्रास येणाऱ्या पिढ्यांना होऊ नये हा त्यामागचा उद्देश. बोरलेपवार यांच्या विचारांत ‘भावनेचा रंग’ होता. चित्रकारांसाठी काहीतरी करतोय, आणखीही काही करायचंय ही ती भावना.

मला निरोप देताना बोरलेपवार म्हणाले : ‘‘मला आपल्या राज्यात एक ‘आर्ट सेंटर’ उभारायचं आहे. चित्रांवर प्रेम करणारा प्रत्येक जण या सेंटरमध्ये मनसोक्तपणे व्यक्त होईल…तिथं राहील…शिकेल…संशोधन करेल आणि आपली कला जगापुढं मांडू शकेल.’’ 

बोरलेपवार यांच्यासारखे चित्रकार पुढं आले तर रंगात रंगून गेलेल्या त्या प्रत्येक कलेचं चीज होईल. नाही का? 

मी बोरलेपवार यांच्याकडून निघालो…त्यांच्या ‘भावनेचा रंग’ बरोबर घेऊन.

संदीप काळे, पत्रकार-लेखक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here