पत्रकारांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करुन स्वयंभू व्हावे – संदीप काळे

प्रशिक्षण कार्यशाळेत ई-फायलींग’ संबंधीत समस्यांचे निराकरण, देशभरातील संपादक आणि पत्रकारांची उपस्थिती

Journalists should acquire technical skills and become independent - Sandeep Kale
Journalists should acquire technical skills and become independent - Sandeep Kale

मुंबई : आजच्या डिजीटल युगामध्ये प्रसार माध्यमात काम करणार्‍या घटकांनी आपल्या क्षेत्रात डिजीटल साक्षर होणे आवश्यक आहे. केवळ दुसर्‍यावर विसंबून न राहता पत्रकार आणि संपादकांनी इंटरनेट संदर्भातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करुन स्वयंभू व्हावे असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मिडीयाचे (Voice of Media) संस्थापक अध्यक्ष संदीप काळे (Sandip kale) यांनी विशेष उपस्थितीमध्ये मार्गदर्शन करतांना केले.

मुद्रीत माध्यमातील संपादक आणि पत्रकारांना पीआरजीआयच्या नव्या संकेतस्थळावरील ‘ई-फायलींग’ संदर्भात येणार्‍या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शनिवार, २२ जून रोजी आयोजीत गुगल मिट आभासी प्रशिक्षणात कार्यशाळेला देशभरातील बहूसंख्य संपादक आणि पत्रकारांनी हजेरी लावून लाभ घेतला. संघटनेच्या साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष तथा तांत्रिक सल्लागार संदीप पिंपळकर यांनी कार्यशाळेत उपस्थित संपादक आणि पत्रकारांना एपिल ते मे च्या दरम्यान करावयाच्या ई-फायलींग संदर्भात सविस्तर आणि सोप्या भाषेत मुद्देसुद प्रशिक्षण दिले.

 मार्गदर्शन करतांना संदीप काळे यांनी सर्वच प्रसार माध्यमातील घटकांना डिजीटल युगाच्या सादेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, पत्रकारांच्या आर्थिक विकासासाठी व्हॉईस ऑफ मिडीया सातत्याने कार्य करत असून संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी अनेक उपक्रम हाती घेवून ते यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. आज डीजीटल क्रांतीने प्रसारमाध्यम क्षेत्रालाही आपल्या कवेत घेतले असून माध्यमेही डिजीटल होत आहेत. अशा प्रसंगी शहरी भागासोबत ग्रामीण भागातील माध्यमांनी या डिजीटल क्रांतीशी मैत्री करुन आपल्या वृत्तपत्रात याचा खुबीने वापर करुन घेतला पाहीजे. तसेच इतरांवर विसंबुन न पाहता वृत्तपत्र क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान परिश्रम आणि जिद्दीने आत्मसात करुन स्वयंभू व्हावे असा आशावादही संदीप काळे यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेला देशभरातील वृत्तपत्र आणि अन्य नियतकालीकांचे संपादक उपस्थित होते. यातील अनेकांनी ई-फायलिंग संदर्भातील समस्या मांडल्या. त्यांच्या समस्यांचे निराकरण संदीप पिंपळकर यांनी केले. त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर उपस्थितांना देऊन संपादकांची फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष ई फायलींग संदर्भातील कोणतीही अडचण सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान संदीप काळे यांनी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने येत्या ४ जुलैला प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या आंदोलनासंदर्भात माहिती देवून सर्व जिल्हाध्यक्षांनी या आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here