
मुंबई l महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव Raigad Taliye Landslide उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तळीयेमध्ये छान, सुंदर कोकणातलं गाव वसवणार!
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गावाच्या पुनर्वसनाचं ठिकाण अजून ठरलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितलं, शासन तुमच्या मागे उभं आहे. धोकादायक परिस्थितीत जी घरं आहेत, ती सुरक्षित ठिकाणी वसवणं आवश्यक आहे. ही सुरुवात आहे. आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. शरद पवारसाहेबांशीही चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सूचना केली होती म्हाडाने अशी घरं बांधून द्यावी. त्यामुळे आम्ही घरं बांधून देणार आहोत. छान सुंदर, कोकणातलं गाव उभं राहील, हे म्हाडा करेल”
‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा’
मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी भरपावसात हातात छत्री धरून स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.
डोंगरातील लोकांचं पुनर्वसन करणार
गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.