दुस-या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला;शिवसेनेचा हल्लाबोल

मेघालयमधील भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला. शुलाय यांनी मांडलेल्या भूमिकेचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे.

sanbor-shullai-meghalaya-bjp-minister-advice-to-eat-beef-shiv-sena-sanjay-raut-saamana-editorial-narendra-modi-bjp-news-update
sanbor-shullai-meghalaya-bjp-minister-advice-to-eat-beef-shiv-sena-sanjay-raut-saamana-editorial-narendra-modi-bjp-news-update

मुंबई l गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहे. भाजपाच्या मंत्र्यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला आहे. या विधानावरून शिवसेनेनं भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे”, असं म्हणत शिवसेनेनं झुंडबळी ठरलेल्यांची भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

मेघालयमधील भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला. शुलाय यांनी मांडलेल्या भूमिकेचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी देशातील समस्त मांसाहारी मंडळींना एक दिव्य संदेश दिला आहे.

मंत्रिमहोदय सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजपा मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. हे असे विधान भाजपाची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात झाले असते तर एव्हाना त्या मंत्र्याच्या घरास घेराव घालून त्यास बडतर्फ करण्याच्या मागण्या सुरू झाल्या असत्या.

इतकेच काय, ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपाच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजपा प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“बीफवरून ‘मोदी-१’ सरकारच्या काळात जे झुंडबळी गेले, ते मानवतेस काळिमा फासणारे प्रकार होते. कोणाच्या घरात कोणत्या प्राण्याचे मांस शिजवले आहे, कोणत्या वाहनांतून गाय, बैल, म्हैस नेत आहेत यावर पाळत ठेवणारी पथके गेल्या निवडणूक काळात निर्माण केली गेली. ही पथके देशभरातील पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये घुसून तेथील किचनमध्ये गोमांस शोधमोहिमा राबवीत होती. पण केंद्रातील किरण रिजीजूसारखे अनेक मंत्री छातीठोकपणे गोमांस भक्षणाचे समर्थन करत होते व त्याबद्दल त्यांना बरखास्त वगैरे करण्यात आले नाही.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर गोव्यात ‘बीफ’ कमी पडू दिले जाणार नाही. वाटल्यास बाहेरून बीफ मागवू व गोवेकरांच्या गरजा भागवू, अशी भूमिका घेतली होती. पर्रीकर हे काय साधेसुधे असामी नव्हते. त्यांच्या विचारांची नाळ हिंदुत्वाशी घट्ट जोडली होती व ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर ‘सेवक’ होते. पण त्यांनी आपल्या राज्यात गोमांस विकायला व खाण्यास पूर्ण सूट देऊनही हिंदुत्ववाद्यांचे मन पेटून उठले नाही.

मोदी सरकारने केंद्रात गोवंश हत्याबंदीचा कायदाच केल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. शेतकऱ्यांवरील भाकड गाई पोसण्याचे ओझे वाढले, पण गाय ही देवता नसून एक उपयुक्त पशू आहे या वीर सावरकरी भूमिकेचे समर्थन करणे हादेखील अपराधच ठरू लागला आहे. अर्थात् दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे”, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“जागोजाग भाजपाचे मंत्री व पुढारीच ‘बीफ’ खाण्याचे समर्थन करीत आहेत व सरकारमधील साध्वी, संत, महंत, मठाधीश गोमातांचे हंबरडे निमूटपणे ऐकत आहेत. मेघालयचे मंत्री सनबोर शुलाई गोमांस भक्षणाचे समर्थन करतात. ईशान्येकडील सर्वच राज्यांत ‘बीफ’ हे त्यांचे मुख्य अन्न आहे व तेथे गोमातांच्या वधावर निर्बंध नाहीत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व इतरत्र गाई म्हणजे गोमाता व गोवा, केरळ, ईशान्येकडील राज्यांत त्या गोमाता नसून फक्त एक उपयुक्त पशू असल्याचे मानावे, असे कोणाचे म्हणणे असेल तर ते वागणे- बोलणे ढोंगीपणाचे आणि दुटप्पी आहे. याबाबतही राज्यानुसार कायदा बदलून कसे चालेल? गोमातांच्या बाबतीतही समान नागरी कायदाच हवा”, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

“गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते व इतर राज्यांत ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी आहे तसा कायदा लावून आमच्या कत्तली थांबवा अशी मागणी करणारा हंबरडा त्यांनी फोडला असता किंवा ज्या राज्याचे मंत्री ‘बीफ’ खाण्याचा प्रचार करतात त्या राज्यांतून गाय जमातीस हिंदुत्ववादी राज्यांत स्थलांतरित करा, अशीही मागणी गाईंच्या संघटनेने करायला मागेपुढे पाहिले नसते. पण शेवटी गाईच त्या. मुक्या-बिचाऱ्या.

कोणीही हाका आणि कोणीही कापा अशीच त्यांची अवस्था झाली आहे. आजही भारतातून ‘टनोटन’ बीफ निर्यात होत आहे व त्यातून येणाऱ्या परकीय चलनावर देशाचा गाडा चालला आहे. पण लहानसहान लोक मात्र ‘बीफ’ प्रकरणांत झुंडबळी ठरत आहेत. गरीबांना मारायचे, पण बीफचा प्रचार करणाऱ्या मंत्र्यां-संत्र्यांना अभय द्यायचे, असे हे नवहिंदुत्व खुळखुळ्याप्रमाणे वाजवलं जात आहे.

मेघालयचे भाजपाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘बीफ’ खाण्याचे समर्थन केले म्हणून त्यांस फासावर लटकवा, देशद्रोही ठरवा असं आम्ही म्हणणार नाही, पण ‘बीफ’प्रकरणी ज्यांचे ‘झुंडबळी’ गेले, बीफ बाळगले म्हणून ज्यांना अपमानित ठरवून गुन्हे दाखल केले गेले, त्या सगळ्यांची माफी मागा! कारण भाजपाच्या मंत्र्यानेच ‘बीफ’चे समर्थन केले आहे”, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here