
मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारीही मातोश्रीच्या बाहेर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं. त्यानंतर आता आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर एक गंभीर आरोप केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी ट्विट करुन माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
२ हजार कोटींचं डील झालं आहे
जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात त्यांच्याबाबत काय बोलणार? मात्र माझ्या पर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की २ हजार कोटींचं डील आत्तापर्यंत झालं आहे. पुरावे लवकरच देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल. जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचं डील केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे तो न्याय नाही तो फक्त एक सौदा आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
भारतीय जनता पक्षाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे.
मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यासाठी हे एवढं मोठं डील झालं आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.