मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही. त्यामुळे अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी नापसंती दर्शवली.
कंगना रनौतची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले. अशी चर्चा सुरु आहे.
कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.









































































































































