“नामांतर झालं याचा आनंद आहे, मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये हे श्रेय…” अमोल मिटकरीचं विधान!

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरास केंद्र सरकराने काल मंजुरी दिल्यानंतर राज्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.

amol-mitkaris-criticism-of-bjp-over-the-renaming-of-aurangabad-osmanabad-news-update
amol-mitkaris-criticism-of-bjp-over-the-renaming-of-aurangabad-osmanabad-news-update

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ’धाराशिव’ करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. काल केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर आता राज्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकार व महाविकास आघाडीमधील नेते मंडळींकडून या मुद्य्यावरून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून भाजपावर टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की, औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करावं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतान त्यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत महाविकास आघाडीसमोर हा प्रस्ताव ठेवला. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना ते करता आलं नाही. मात्र महाविकासआघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली आणि आता आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम भाजपाकडून होतंय.”

याशिवाय, “त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई नाही, निश्चितच नामांतर झालं याचा आनंद आहे. मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये. हे श्रेय महाविकास आघाडीचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे.” असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचं आहे की संपूर्ण जिल्ह्याचं यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्पष्टीकरण मागत निशाणा साधला.

नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर अंबादास दानवेंनी त्या निर्णयाचा फोटो शेअर करत म्हटलं, “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here