पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा !: अतुल लोंढे

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे.

Why didn't Fadnavis go to break Manoj Jarang's hunger strike? : Atul Londhe
Why didn't Fadnavis go to break Manoj Jarang's hunger strike? : Atul Londhe

मुंबई : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, कोकणात होणाऱ्या रिफायनरीच्या विरोधात बातम्या लिहिल्याच्या रागातून पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकार वारिसे हे बारसू येथील रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडशी संबंधित बातम्यांचे कव्हरेज करत होते. याचाच राग धरून रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना व पत्रकारांना धमकावण्याचे काम पंढरीनाथ आंबेरकर करत होता. पत्रकार वारिशे यांची बातमी सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झाली होती आणि त्याच दिवशी दुपारी राजापूर कोदवलीजवळील पेट्रोल पंपासमोर वारिशे यांच्या स्कूटीवर महिंद्रा थार चढवून त्यांची हत्या करण्यात आली. पत्रकार वारिशे यांच्या हत्येसंदर्भात प्रसार माध्यमासह जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पत्रकार संघटनांनीही गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. पत्रकार संरक्षण कायदा असतानाही गुन्हेगारांची हिम्मत वाढलेली आहे. पत्रकाराची हत्या ही लोकशाहीची निघृण हत्या असून पुरोगामी महाराष्ट्रावरचा कलंक आहे. प्रसार माध्यमांना स्वतंत्र व भयमुक्त वातावरणात काम करता आले पाहिजे, पत्रकारांवर हल्ले होत राहिले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कमकुमवत होईल.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार खुलआमपणे गोळीबार करतात, हातपाय तोडण्याची धमकी देतात, प्राचार्यांना मारहाण करतात. पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावतात पण शिंदे- फडणवीस सरकार मात्र कारवाई करत नाही. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज होऊ नये यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी गुन्हेगाराला अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असेही लोंढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here