मुंबई l देवेंद्र फडणवीस Fadnavis Government सरकारच्या काळात उद्योगस्नेही ( Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर २०१८ साली १३ व्या स्थानावर होता. कोरोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल यात भाजपा तरबेज असून भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दिक्षा घेऊन बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी आहेत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत थापेबाजी करणाऱ्या भाजपाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा जीएसटी उत्पन्नात ३७२८ कोटी रुपयांनी घट झाली आहे असे दुसरे धादांत खोटे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे. प्रत्य़क्षात एप्रिलमध्ये राज्याचा जीएसटी १२३५० कोटी रुपये, मे महिन्यात ७९८३ कोटी रुपये, जूनमध्ये ८३४९ कोटी रुपये, जुलैमध्ये ११३८८ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये १२६४४ कोटी रुपये असून या कालावधीत एकूण ५२७१४ कोटी रुपये उत्पन्न झालेले आहे. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात जीएसटी उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे भातखळकर खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होते.
तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते त्यात या वर्षी ६७.२९ टक्के वाढ झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत असतात.हे सरकार सत्तेवर आल्यापासून कोरोनासह नैसर्गिक संकटांचा सामना सातत्याने करत असतानाही राज्याच्या विकासाची गती थांबू दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारवर जनतेसह उद्योग क्षेत्राचाही विश्वास आहे. खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाजपा नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत, असेही सावंत म्हणाले.