मुंबई: देशभरात सध्या पेटणाऱ्या चितांचा धूर उडताना दिसत असल्याचं दृश्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील परिस्थिती बिकट झाली असून, बेड, औषधी, ऑक्सिजन, लस यांचा तुटवडा भेडसावत आहे. दररोज अडीच ते तीन हजार लोक मरण पावत असून, याची आता राज्यातील विविध उच्च न्यायालयांपाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने देशातील परिस्थितीवरून केंद्राची कान उघाडणीही केली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावल्यानंतर शिवसेनेनं भाजपा नेत्यांना सवाल करत सर्वोच्च न्यायालयावर गंभीर आरोप केला आहे. coronavirus-covid-19-supreme-court-central-govt-modi-govt-narendra-modi-amit-shah-bjp-sanjay-raut-shiv-sena-news-update
देशातील कोरोना परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान उपटले. आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने केंद्राला उपाययोजनासंदर्भात जाब विचारला. सर्वोच्च न्यायालयाने परिस्थितीची दखल घेत स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उशिराने भूमिका घेतल्याने देशात ही परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखात भूमिका मांडली आहे.
“झोपी गेलेला जागा झाला अशी काहीशी अवस्था आपल्या न्यायालयांबाबत झालेली दिसते”
“झोपी गेलेला जागा झाला अशी काहीशी अवस्था आपल्या न्यायालयांबाबत झालेली दिसते. ‘आम्ही जागे आहोत’ असे ते अलीकडे वारंवार सांगून लोकांनाही जागे करीत आहेत. मद्रास हायकोर्टाने कोरोनासंदर्भात निवडणूक आयोगाचे कान उपटल्यावर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही डोळे वटारले आहेत.
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणे केंद्र सरकारला सुनावले आहे. देशातली कोरोनास्थिती गंभीरच आहे. ऑक्सिजन, बेड, लसीची कमतरता हे विषय चिंताजनक आहेत. देशातील गंभीर कोरोनास्थितीची स्वतःहून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.
”देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार”
सर्वोच्च न्यायालय शेवटी सांगत आहे, ‘आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही’. म्हणजे सर्वोच्च न्यायालय नक्की काय करणार आहे? कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातले मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आरोग्यविषयक यंत्रणा कोलमडली आहे व देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे.
”संपूर्ण देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा”
सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत व त्याबद्दल आता भाजपा पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? महाराष्ट्रात कोविड इस्पितळांना लागलेल्या आगींचे कारण देत भाजपाचे लोक राज्य सरकारचा राजीनामा मागतात, पण उत्तर प्रदेश, दिल्लीसह संपूर्ण देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा हे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्ष सुनावले आहे. ते काही असो. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशावर हे अरिष्ट ओढवले आहे,” असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
”बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आदळले”
“प. बंगालच्या निवडणुकीतील शक्तिप्रदर्शन, हरिद्वारचा कुंभमेळा, त्यानिमित्त सुरू झालेले राजकारण व लपवाछपवी याबाबत बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आदळले आहे. मास्क न वापरल्यामुळे थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओचा यांना दंड ठोठावण्यात आल्याची बातमी आपल्या देशातील न्यायालयांची झापडे उघडणारी आहे.
”थायलंडच्या पोलिसांनी जे केले ते वेळोवेळी आपल्या न्यायालयाने केले असते तर”
थायलंडमध्ये कोरोनाच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत. पंतप्रधान जनरल प्रयुत हे लस खरेदी बैठकीत उपस्थित होते, पण त्यांनी मास्क घातला नव्हता. बँकॉकचे गव्हर्नर असाविन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून पंतप्रधानांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटोही जोडला. त्या बैठकीत इतरांनी मास्कचा वापर केला होता तसा थायलंडच्या पंतप्रधानांनी मास्कचा वापर केला नव्हता. त्यानंतर संपूर्ण देशातून पंतप्रधानांवर टीकेचा मारा सुरू झाला व पोलिसांना पंतप्रधानांवर कारवाई करावी लागली. थायलंडच्या पोलिसांनी जे केले ते वेळोवेळी आपल्या न्यायालयाने केले असते तर ‘आम्ही फक्त बघे नाहीत’ असे सांगण्याची वेळ आली नसती.
”देशाचे गृहमंत्री विनामास्क गर्दीत वावरत होते”
प. बंगाल निवडणुकीत देशाचे गृहमंत्री विनामास्क गर्दीत वावरत होते. जनता विनामास्क रोड शो व सभांना गर्दी करीत होती. कुंभमेळ्यातही तेच भयंकर चित्र होते. यावेळी निवडणूक आयोग, पोलीस व न्यायालयेही बघ्याच्याच भूमिकेत होती. कोरोनाबाबत हिंदुस्थानची परिस्थिती विदारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे व त्यास सोनिया गांधी किंवा पंडित नेहरू, इंदिरा गांधी जबाबदार नाहीत,” असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकार आणि भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.
हेही वाचा : ‘’तिसरी लाट येईल गृहीत धरून काटेकोर नियोजन करा’’
“ऑक्सिजन पुरवठा व लसीचे वितरण याबाबत राष्ट्रीय योजना बनवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ही मागणी विरोधकांकडून वारंवार होत आहे, पण करोनाचा लढा फक्त आम्हीच लढणार व आम्हीच जिंकणार या राजकीय ईर्षेपोटी राज्यकर्त्यांनी देशाचे स्मशान करून टाकले आहे व स्मशानात चितांचा वणवा भडकल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.
”…त्या अपराधाबद्दल कुणाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा”
देशात ज्या प्रकारच्या मृत्यूचे तांडव चालले आहे तो अमानुष प्रकार म्हणजे सामाजिक अपराध आहे व त्या अपराधाबद्दल कुणाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तेसुद्धा ‘डोळस’ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करायला हवे. कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपा पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. परिस्थिती हाताबाहेर गेलीच आहे.
”कोविडच्या युद्धात आता संरक्षण दलास उतरावे लागले”
कोविडच्या युद्धात आता संरक्षण दलास उतरावे लागले. रशियाची लसही हिंदुस्थानात पोहोचत आहे. पाकिस्तानसारखा देशही हिंदुस्थानला आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करू इच्छितो. मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी व सर्वसमावेशक राष्ट्रीय योजना बनवून त्यात सर्वपक्षीय नेत्यांना सामील करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाने डोळे उघडले हे ठीक, पण केंद्र सरकारने उघड्या डोळय़ाने पाऊल टाकावे हेच खरे,” असा सल्ला शिवसेनेनं दिल्लीतील मोदी सरकारला दिला आहे.



















































































































































































