देशातल्या कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे काँग्रेसची एकहाती सत्ता, जाणून घ्या माहिती!

Cancel the candidature of BJP's Nitin Gadkari who misused Lord Rama for votes: Atul Londhe
Cancel the candidature of BJP's Nitin Gadkari who misused Lord Rama for votes: Atul Londhe

Karnataka Assembly elections 2023 : केंद्रात मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून राजकारणात काँग्रेसची जादू कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. २०१४, २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. काँग्रेसने नेतृत्त्वात बदल केल्यानंतरही काँग्रेसची पीछेहाट कमी झाली नाही. अखेर काँग्रेसने लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली. यामुळे गांधी परिवाराकडे असलेली काँग्रेसची सूत्रे आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे गेली आणि कर्नाटकात अभूतपूर्व यश मिळाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून काँग्रेसला १३५ जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपाला ६६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, कोण-कोणत्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे हे पाहुयात.

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने काँग्रेस पुन्हा एकदा देशपातळीवर सत्ताधारी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो असा विश्वास विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक निवडणूक निकाल हा त्याची नांदी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. भारत जोडो यात्रेमुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला उभारी मिळाली. याचाच फायदा कर्नाटकात दिसून आल्याचंही राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. तसंच, यापुढे काँग्रेसला आणखी जोराने काम करावे लागणार असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, कधीकाळी सत्ताधारी असलेला काँग्रेस पक्ष मधल्या काही वर्षांत मागे पडला होता. परंतु, आता पुन्हा देशातील अनेक राज्यात काँग्रेस सत्ताधारी आहे.

  • हिमाचल प्रदेशमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका झाल्या होत्या. त्याच काळात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. हिमाचल प्रदेशमध्येही काँग्रेसला चांगले यश मिळाले. सध्या सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेसचे नेते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.
  • छत्तीसगडमध्येही काँग्रेसची सत्ता असून १७ डिसेंबर २०१८ पासून तिथे भुपेश बघेल मुख्यमंत्री आहेत.
  • राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात फुट पडली असली तरीही काँग्रेसने येथे सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. १७ डिसेंबर २०१८ पासून अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत.
  • तर, तमिळनाडू, बिहार आणि झारखंडमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस या राज्यात सत्तेवर आहे.
  • आता कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने कर्नाटकातील पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार आहे. डि. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असून या दोहोंपैकी कोणाचं नाव जाहीर होतंय हे पाहावं लागणार आहे.

म्हणजेच, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. कर्नाटकातही काँग्रेस लवकरच सत्ता स्थापन करेल. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या राज्यांची संख्या ४ होईल. तर, इतर पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस तीन राज्यात सत्तेवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here