
औरंगाबाद : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्ती संग्रामाला दांडी मारतात असा त्यांच्यावर शिवसेनेकडून आरोप केला जातो. परंतु या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अनुपस्थित होते. त्यांनी मुंबईहून ऑनलाइन पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आता इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.
इम्तियाज जलील यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं वावडं आहे आणि ते स्वत:ला निजामाचे वारसदार समजतात असं म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर निशाणाही साधला होता. परंतु या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अनुपस्थित होते. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन मीडिया आणि शिवसेनेला सवाल केला आहे.
इम्तियाज जलील यांचा ट्विटवरून सवाल, म्हणाले…
“मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे ?,” असा सवाल त्यांनी केला आहे.
“शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही?, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो,” असंही ते म्हणाले.


















































































































































































