“बांगलादेशनेही ईव्हीएम निवडणुका बंद केल्या, भारतात बंदी घालावी”, संजय राऊतांचं मोठं विधान

Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today

पुणे: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशातील ईव्हीएम (EVM) निवडणुकांवरून मोठं विधान केलं. “ईव्हीएमवर निवडणुका घेणारा भारतानंतर बांगलादेश शेवटचा देश आहे. आता बांगलादेशनेही ईव्हीएम निवडणुका बंद केल्या आहेत. त्यामुळे भारतातही ईव्हीएमवर बंदी घालावी”, अशी मागणी संजय राऊतांनी केली. ते शुक्रवारी (७ एप्रिल) पुण्यात मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

“देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय”

संजय राऊत म्हणाले, “देशाची लोकशाही टिकवायची असेल, तर कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमला विरोध झाला पाहिजे आणि निवडणुका मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) झाल्या पाहिजे. या देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय आहे. आपला शेजारी देश बांगलादेश आहे. ईव्हीएमवर निवडणुका होणारा बांगलादेश भारतानंतर शेवटचा देश होता. त्या बांगलादेशच्या प्रमुख शेख हसिना यांनी ईव्हीएम निवडणुका रद्द करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची घोषणा केली.”

 “बांगलादेशने ईव्हीएमवरील निवडणुका घेणं बंद केलं”

“विरोधकांना ईव्हीएम लोकशाहीसाठी मारक आहे असं वाटतं. त्यामुळे शेख हसिना यांनी बांगलादेशच्या निवडणुका ईव्हीएमवर होऊ नये, असं मत मांडलं. तसेच ईव्हीएम रद्द केलं आणि मतपत्रिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“रिमोट वोटिंग म्हणजे रिमोट भ्रष्टाचार”

“रिमोट वोटिंग म्हणजे रिमोट भ्रष्टाचार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हा रिमोट भ्रष्टाचार केला जात आहे. ते हाताने मशिन हॅक करतील. ते कागदावर का करत नाहीत. आजही माझा कागदावर विश्वास आहे. मी कुणाला शिक्का मारतोय हे मला दिसलं पाहिजे,” असंही राऊतांनी नमूद केलं.

“देश धर्मानुसार चालला तर आपला पाकिस्तान होईल”

संजय राऊतांनी धर्मावर आधारित देशांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा देश भारताच्या घटनेनुसारच चालला पाहिजे. जर देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा पाकिस्तान होईल, या देशाचा इराण होईल, या देशाचा इराक होईल, या देशाचा सिरिया आणि म्यानमार होईल. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्रदयसम्राट म्हणून ओळखले जातत. भाजपाचं हिंदुत्व नंतर आलं. त्यांचं हिंदुत्व चोरलेलं आहे. ते बोगस आहे.”

“बाळासाहेब म्हणाले होते की, मला हिंदुंचा खोमेनी व्हायचं नाही”

“इराणमध्ये अयोतुल्ला खोमनी हा इस्लाम धर्माचं राज्य घेऊन आला, तेव्हा इथं बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा आवाज उठवत होते. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, नक्कीच मी हिंदुत्वाचा विचार मांडतो, पण हा देश एक राहिला पाहिजे. हा देश सर्व जाती-धर्माच्या लोकांचा आहे. मला हिंदुंचा खोमेनी व्हायचं नाही. ही आमची परंपरा नाही, आमची संस्कृती नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

 “धर्माच्या आधारावर उभे राहिलेले देश टिकले नाहीत”

“धर्माचं राष्ट्र करणारे रिपब्लिक ऑफ इस्लाम खूप आहेत. ते देश धर्माच्या आधारावर उभे राहिलेत. मात्र, ती राष्ट्रे टिकली नाहीत. पाकिस्तान, बांग्लादेश, सिरिया, इराण, इराक, अफगाणिस्तान असे देश बघा. अफगाणिस्तान धर्माचं राष्ट्र आहे. तिथं तालिबानने काय केलं,” असंही राऊतांनी नमूद केलं.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here