मुंबई : मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. केम छो वरळी असं कॅप्शन देऊन शिवसेनेला डिवचले. (Sandeep Deshpande Tweet Worli Situation).
विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी ‘केम छो वरळी’ असे फलक लावले होते. तोच धागा पकडून आता संदीप देशपांडे यांनी टीका केली केली. वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वरळीकरांना नाहक त्रासाला सोमोरे जावं लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. ‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, ब्रांद्रा या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पूर्व उपनगरात पावसाच्या जोर थोडा कमी आहे. परंतु वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे.
गेले काही दिवस मुंबईत पावसाने विश्रांति घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. दादर, हिंदमाता, सायन, परेल, अंधेरी सबवे सारख्या अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.
वरळी परिसरातहू मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. वरळीतील चाळींमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे बैठ्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी भरलं आहे. नागरिक घरातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत पाणी ओसरणार नाही.
मुंबईसह ठाणे, रायगडला अतिवृष्टाचा इशारा
मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.





















































































































































































