कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून सरदार पटेलांचा उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल;शिवसेनेचा टोला

shivsena-slams-kangana-ranaut-controversial-statement-on-freedom-targets-bjp-news-update
shivsena-slams-kangana-ranaut-controversial-statement-on-freedom-targets-bjp-news-update

मुंबई: देशाला १९४७ साली मिळालं ते स्वातंत्र्य नसून भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, या कंगना रनौतच्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. निरनिराळ्या मुद्द्यांवरून कंगना रनौतला पाठिंबा देणाऱ्या भाजपावर आता शिवसेनेनं आगपाखड सुरू केली आहे. सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनं कंगना रनौतच्या या विधानाचा समाचार घेत भाजपावर देखील निशाणा साधला आहे. “कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला सर्वात उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

“कंगनाबेन यांना नुकतेच पद्मश्री या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव आहे. कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला आहे. तिचं नथुरामप्रेमही उफाळून येत असतं.

हेही वाचा: देशात नव्यानं पेटवा-पेटवी करण्याचं काम भाजपाने सुरू केलंय;संजय राऊतांचा हल्लाबोल

तिच्या बरळण्याकडे एरवी कुणी फारसं लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात, असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं ठरतं”, अशा शब्दांत शिवसेनेकडून कंगना रनौतवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

कंगनाबेनचे भिकार वक्तव्य ऐकून सरदार पटेलांचा पुतळाही…

दरम्यान, कंगना रनौतला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. “शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचं वक्तव्य भाजपावाले करत असतात. महाराष्ट्रातली सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो. पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवलं आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने…

दरम्यान, कंगना रनौतच्या निमित्ताने शिवसेनेने अग्रलेखातून भाजपा आणि मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे,. “कंगनाबेनचे डोके बधीर झाले आहे असे वरुण गांधी म्हणतात, कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडे शोधू शकतील. पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल, तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील”, अशा खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

“सलमान खुर्शीद हे पुरुष वेषातील कंगना रणौत”

काय म्हणाली होती कंगना?

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले आहे. ‘‘देशाला १९४७मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असे विधान तिने केले. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर उमटू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here