“फडणवीसांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण…”, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन शिवसेनेचा खोचक टोला; म्हणाले…

Shinde government's 'fake' of bringing huge investment from Davos: Atul Londhe
Shinde government's 'fake' of bringing huge investment from Davos: Atul Londhe

मुंबई: नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच’. याचा अर्थ स्पष्टच की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे व फडणवीस वगैरे लोक सरकार व शिंद्यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत. बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे, असा टोला शिवसेनेने ‘सामना’तून शिंदे गटाला लगावला आहे.

“भारतीय जनता पक्षाच्या मनातली वेदना अचानक उसळून ओठावर येते. ‘मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. बावनकुळे हे फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. दुसरे असे की, इतके मोठे विधान बावनकुळे स्वतःच्या मनमर्जीने करणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या मनातली इच्छा बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली असे मानायला जागा आहे,” असे शिवसेनेने म्हटलं आहे.

 “चंद्रकांत पाटील यांनीही चार महिन्यांपूर्वी वेगळे काय सांगितले होते? ‘शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले.’ हे पाटील यांचे विधान व आताचे बावनकुळ्यांचे बोलणे लक्षवेधी आहे. भाजपच्या मनावरील दगड बाजूला करण्याचे काम सुरू झालेले दिसते व फडणवीस त्या कामी कामाला लागले आहेत. हा दगड छाताडावर ठेवून किती काळ काम करायचे? हा प्रश्न भाजप परिवारासही पडलाच आहे,” असे सुद्धा शिवसेनेने सांगितलं.

“फडणवीस यांचा हक्क असताना शिंद्यांना मुख्यमंत्री करणं ही तडजोड होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यासाठी कोट चढवलाच होता, पण दिल्लीच्या आदेशाने होत्याचे नव्हते झाले. फडणवीसांनी शिंदे गटाच्या हाताखाली काम करणे म्हणजे सिंहाने कोल्ह्यांच्या झुंडीचे ‘राज्यपद’ मान्य करण्यासारखे आहे. याची टोचणी फडणवीस यांच्या मनास असणारच. दुसरे असे की, शिंदेंबरोबर ५० लोक गेले हा भ्रम आहे. त्यांच्याबरोबर फार तर सात-आठच आमदार गेले. बाकीच्यांना फडणवीस यांनीच फितवून, धमकावून पाठवले असे म्हणतात. त्या कामी केंद्रीय तपास यंत्रणा, प्रलोभने, खोके वगैरेंचा वापर झाला. फडणवीस यांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण घोड्यावर टपकन जाऊन बसले दुसरेच कोणी!,” असेही शिवसेना म्हणाली.

“फडणवीस हे किती काळ महाराष्ट्रात ‘डेप्युटी’ म्हणजे ‘उप’ राहणार? कालपर्यंत ते राज्याचे ‘मुख्य’ होते, बाकी सारे त्यांचे डेप्युटी होते. आज फडणवीस त्याच डेप्युटीच्या हाताखाली काम करीत आहेत व बावनकुळे वगैरेंना हे मान्य नाही. फडणवीस यांनी घडवलेला व बिघडवलेला मोठा कंपू भाजपात आहे. त्या सगळ्यांच्या वतीने बावनकुळे यांनी पुन्हा फडणवीस! अशी गर्जना केली. आता ‘मिंधे’ गटाचे आमदार व प्रवक्ते बावनकुळे यांच्या गर्जनेवर काय भूमिका घेणार?,” असा सवाल शिवसेनेने शिंदे गटाला विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here