मुंबई l एसटी कर्मचा-यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावं यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं.
एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी थकीत वेतनाबाबत चर्चा केली व या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.
वाचा l मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता,हाय अलर्ट जारी
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आलं. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळणार कधी?, असा सवाल एसटी कामगार संघटनांनी विचारला होता. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते द्यावे, त्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.
वाचा l रामदास आठवले यांना कोरोना,पायल घोषही करणार तपासणी
यासंदर्भात राज्यपालांना निवेदनही देण्यात आलं होतं. पुढील दोन महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी आदेश देण्याबाबत राज्यपालांकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यापूर्वी दिली होती.