पाटणा Patna l बिहार विधानसभेसाठी Bihar Assembly Election 2020 दुसऱ्या टप्प्याचे आज मंगळवार (3 नोव्हेंबर) मतदान होत आहे. १७ जिल्ह्यांतील ९४ जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी १६ जिल्ह्यांतील ७१ जागांसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी १५ जिल्ह्यांतील ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल.
बिहार विधानसभेत २४३ जागा आहेत. बहुमतासाठी १२२ जागा जिंकणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या आठ मंत्र्यांचे भवितव्य पहिल्या टप्प्यात इव्हीएममध्ये बंद झाले. चार मंत्र्यांचे भवितव्य आज सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात इव्हीएममध्ये बंद होत आहे.
सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान पार पडेल. कोरोना संकटामुळे मतदार तसेच निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क घालण्याचे तसेच सोशल डिस्टंसचे बंधन असेल. प्रत्येक बूथवर फक्त एक हजार मतदारांचे मतदान अशी व्यवस्था केली आहे.
या चार मंत्र्यांचे भवितव्य आज ठरणार
पाटणा मतदारसंघातून रस्ते निर्माण मंत्री नंद किशोर यादव, मधुबन मतदारसंघातून सहकार मंत्री रणधीर सिंह, नालंदा मतदारसंघातून ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि हथुआ मतदारसंघातून राज्य मंत्री रामसेवक सिंह निवडणूक रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यात या मंत्र्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये झाले बंद
पहिल्या टप्प्यात कृषी मंत्री आणि भाजप नेता डॉ. प्रेम कुमार, जेडीयू नेता आणि बिहारचे शिक्षणमंत्री कृष्ण नंदन वर्मा, भाजप नेता आणि श्रममंत्री विजय कुमार सिन्हा, बिहारचे अनुसूचित जाती जनजाती कल्याण मंत्री बृजकिशोर बिंद,बिहारचे परिवहन मंत्री आणि जेडीयू नेता संतोष कुमार निराला, ग्रामीण कार्य मंत्री आणि जेडीयू नेता शैलेश कुमार, बिहारचे विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्री जय कुमार सिंह तसेच बिहारचे महसूल मंत्री रामनारायण मंडल यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात सारण जिल्ह्यातील परसा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलचे नेता तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय निवडणूक लढवत आहेत. ते जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चंद्रिका राय यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलकडून छोटे लाल यादव निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा l Maharashtra legislative council election l महाविकास आघाडी-भाजपमध्ये पहिलाच सामना
राघोपूर मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचे नेता तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. तेजस्वी यांच्या विरोधात भाजपकडून सतीश कुमार निवडणूक रिंगणात आहेत. समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलचे नेता तेज प्रताप यादव निवडणूक लढवत आहेत.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए (National Democratic Alliance – NDA) आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन निवडणूक लढवत आहे. एनडीएमधून बाहेर पडून लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.




















































































































































































