
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East By Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murli patel) यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. असे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रात नेमके काय आहे?
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
“माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल
“मी माझ्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.