सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई राजकीय द्वेषातून, ना डरंगे, ना झुकेंगे !: नाना पटोले

सोनिया गांधी व राहुल गांधींना पाठवलेल्या ईडीच्या नोटीसीचा सर्व काँग्रेस नेत्यांकडून निषेध.

Sonia Gandhi Rahul Gandhi get ED notices in National Herald case Congress cries vendetta politics news update today
Sonia Gandhi Rahul Gandhi get ED notices in National Herald case Congress cries vendetta politics news update today

शिर्डी/मुंबई: काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी (Sonia Gandhi)व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने पाठवलेली नोटीस राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कारभार मात्र हुकूमशाहीपद्धतीने करत आहे. ईडीच्या (ED Notice) या नोटीसीचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत असून अशा कारवायांना काँग्रेस भिक घालत नाही असे प्रभारी एच. के. पाटील (H.K.PATIL) यांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. अमर राजूरकर, आमदार संग्राम थोपटे, आ. अमित झनक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करून हुकूमशाही निर्माण करू पाहणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली आहे. देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेली ईडीची कारवाई ही भाजपच्या किडक्या डोक्यातून निघालेली असून फक्त राजकीय द्वेषातून झाली आहे. भाजपाने सात्यत्याने देशांमध्ये जाती-जाती, धर्म-धर्मामध्ये द्वेष निर्माण केला आहे. देश विक्री करणा-या या सरकारने सुरूवातीपासून देशाची अस्मिता असलेल्या नेहरू-गांधी घराण्यावर टीका केलेली आहे.

आठ वर्षापूर्वी संपलेले प्रकरण नवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उकरून काढले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही फक्त राजकीय द्वेषातून झाली असून भाजपाच्या किडक्या डोक्यातून निघालेली ही आयडीया आहे.

भाजपने कितीही कारवाया केल्या तरी त्यांच्या कारवायांना काँग्रेस कधीही घाबरणार नाही. संपूर्ण देश सोनिया गांधींच्या पाठीशी असून हुकुमशाही के आगे कभी नही झूकेंगे, देश के लिए आखरी दम तक लढेंगे, असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने कायम सर्वधर्मसमभाव जोपासला आहे. मात्र सध्या भाजप सरकारकडून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. गांधीजींचे विचार व पंडितजींची भारत उभारण्याची संकल्पना घेऊन काँग्रेस पक्ष काम करत आहे.

सध्या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना हरताळ फासून हुकूमशाही निर्माण करण्याचे काम होत आहे. या विरुद्ध भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले जाईल. भारतातील जनता ही काँग्रेससोबत असून आगामी काळात समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, अशा प्रकारच्या कारवाया होणे हे अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीला घातक आहे. काँग्रेस पक्षाने कायम सर्वधर्मसमभाव जोपासला असून सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला आहे.

या चिंतन शिबिरातून मागासवर्गीय समाजाला ही मोठ्या संधी देण्याबरोबरच त्यांच्या विभागासाठी असलेली आर्थिक तरतूद पूर्णपणे खर्च होण्यासाठी काही सूचना सदस्यांनी मांडल्या आहेत याबाबत विचारविनिमय करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here