मनपाचा नवीन फंडा: पैसे भरा, टँकर आणून पाणी घेऊन जा!

821-crores-and-demand-municipal-corporation-the-work-of-water-supply-scheme-is-in-progress-news-marathi-update-today
821-crores-and-demand-municipal-corporation-the-work-of-water-supply-scheme-is-in-progress-news-marathi-update-today

औरंगाबाद: ज्या भागात नळ नाहीत, तिथे (नो नेटवर्क एरिया) औरंगाबाद महापालिकेतर्फे (AMC) टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. अनेक भागात सध्या बोअर आटले असून, पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने गरजू नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकर्सच्या ‘पेड ट्रिप्स’चा पर्याय शोधला आहे. पैसे भरा, टँकर आणून पाणी घेऊन जा, अशी योजना सुरू करण्यात आली आहे.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय-योजना सुरू आहेत. तसेच ज्या भागात नळ जोडण्या नाहीत अशा ‘नो नेटवर्क’ भागात महापालिका टँकरव्दारे पाणी पुरवठा करते.

दरवर्षी उन्हाळ्यात टॅंकरची मागणी वाढते. सध्या सुमारे ८० टँकर्सच्या साहाय्याने दिवसभरात सव्वा चारशे खेपा केल्या जात आहेत. दोन दिवसाआड नागरिकांना २०० लीटरचा एक ड्रम पाणी दिले जाते. आता पेड ट्रिप्सचा पर्याय महापालिकेने सुरू केला आहे.

वरिष्ठांची शिफारस आवश्यक

पेड ट्रिप्समध्ये महापालिका संबंधित व्यक्तीकडून पाण्याचे पैसे भरून घेते व त्यांना टँकर आणून पाण्याच्या टाकीवरून पाणी घेऊन जाण्यास परवानगी दिली जाते. मात्र यासाठी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस आवश्‍यक आहे. दोन हजार लीटर, पाच हजार लीटर व दहा हजार लीटर अशा तीन क्षमतेचे टँकर्स असतात. त्यापैकी दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर्स फारच कमी आहेत. दोन आणि पाच हजार लीटर क्षमतेच्या टँकर भरण्यासाठी मागणी असते. एक हजार लीटरला शंभर रुपये या प्रमाणे महापालिका शुल्क वसुल करते.

हेमंत कोल्हे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here