मुंबई : काँग्रेस पक्षाने (Congress) कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा, अशी मागणी केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (All India Congress Committee) मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा (pawan khera) यांनी सांगितले.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-याची भेट घेऊन भाजपा विरोधात लेखी तक्रार केली. यावेळी पवन खेरा यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, सचिन सावंत, चरणजित सप्रा, विधी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड रवी जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर भाजपाने काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेस पक्षाने गॅरंटी लागू केल्या नाहीत असा अपप्रचार करण्यात आला आहे. निवडणूक आयोग काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेऊन भाजपावर तात्काळ कारवाई करेल अशी अपेक्षा आहे असे पवन खेरा म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत १३३ कट्टरपंथीय संघटना होत्या या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणुकीत पराभव होत असल्याचे दिसू लागतात असे अहवाल बाहेर काढले जातात. दलित, आदिवासी, गरिब, महिला, शेतकरी व युवकांचे प्रश्न उपस्थित होताच अशा प्रकारे सणसणाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांना मारण्याची धमकी आल्याचे सांगितले होते पण तो मेल हॅक करून पाठवण्यात आल्याचे नंतर उघड झाले. भाजपाला पराभव दिसू लागला आहे, देवेंद्र फडणवीससुद्धा निवडणूक हरत आहेत, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडले असावे. काल राहुल गांधींबद्दल शहर नक्षलवाद्यांचे विधान केल्यानंतर हा अहवाल पुढे केला जात आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.