“३८ पिढ्यांना आम्ही शिकवलं…, डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केली ‘ही’ खंत

मुंबई: जे. जे रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane) यांनी राजीनामा दिला होता. तो राजीनामा ( ३ जून ) राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. जे.जे रुग्णालयातील काही निवासी डॉक्टरांनी तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्या पार्श्वभूमीवर लहाने यांनी राजीनामा दिला होता.

राजीनामा मंजूर झाल्यावर तात्याराव लहाने यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी जून २०२१ मध्येच सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तीनंतर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचं काम मला दिलं होतं. पण, २२ मे ला आमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आमच्या तक्रारीची चौकशी योग्य रितीने जात नाही पाहिल्यावर, आम्ही अधिष्ठांना विनंती केली की, अधिकाऱ्याची बदली करावी. कारण, या अधिकाऱ्याची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी यांनी चौकशी केली होती. पण, तसं झालं नाही.”

“विद्यार्थ्यांचा आरोप होता की, शिकवलं जात नाही. तर तो १०० टक्के चुकीचा आहे. तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया शिकवल्या होत्या. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवणं चालू केलं होतं. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग चालू होतं. पण, रुग्ण तपासणे याला ते कारकूनी काम समजत होते. या विद्यार्थ्यांना शिकता यावं यासाठी प्रत्येक शस्त्रक्रिया टीव्हीवर दाखवली जात होती,” अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली.

“३८ पिढ्यांना आम्ही शिकवलं आहे. आता पास होऊन आलेली मुलं आरोप करतात हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आजपर्यंत गरीब रुग्णांना आम्ही दृष्टी देत आलो आहोत. त्यांना अंध होताना आम्ही पाहू शकत नाही. जे सहाव्या महिन्यात मोतीबिंदू शिकवतात, त्यांना आणावं आणि शिकवावं. म्हणून आम्ही आमच्या जागा मोकळ्या केल्या. सरकारकडे आम्ही राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली होती. ती सरकारने मंजूर केली आहे,” असे तात्याराव लहाने यांनी सांगितलं. “आम्हाला बाजू मांडू दिली नाही, त्यामुळे याच्यामागे निश्चित कोणतरी असेल, असं वाटतं,” अशी शंकाही तात्याराव लहाने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here