पंढरपूर : मोबाईलसारख्या माध्यमांमुळे कोरोनाविषयीची भीती वाढली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वॅब घेतला तरी ते पॉझिटिव्ह येतील. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली नसेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आंबेडकरांनीसोमवारी पंढरपुरात आंदोलन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गर्दी झाल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतो, हा दावा फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, घाऊक बाजारात दररोज व्यापाऱ्यांची गर्दी होते. यापैकी किती टक्के लोकांना कोरोना झाला असा सवाल उपस्थित केला.
राज्यात एसटी सेवा सुरु झाल्यानंतर आतापर्यंत २१ लाख लोकांना प्रवास केला आहे. सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घातल्याचे सांगते. पण लॉकडाऊनमध्ये शहरातील लाखो लोक पायी चालत आपल्या गावी गेले. त्यामुळे गावांमध्येही कोरोनाचा प्रसार झाला.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ८५ टक्के लोक कोरोनातून बरे झाले असतील तर भिण्याचे काय कारण आहे?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
राज्यातील मंदिरे उघडावीत यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन मागे घेतले. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला १० दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांना विठुरायाचे मुखदर्शन घेऊ देण्यात आले.